महिला रुग्णालयाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 12:16 AM2017-07-10T00:16:14+5:302017-07-10T00:16:14+5:30
जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण येत असतात. महिला रुग्णाकरिता अतिशय कमी प्रमाणात रुग्णसेवा ...
१०० खाटांचे रुग्णालय : परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण येत असतात. महिला रुग्णाकरिता अतिशय कमी प्रमाणात रुग्णसेवा असल्यामुळे महिला रुग्णांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो. शासनाने भंडारा येथे १०० खाटांचे रुग्णालयाच्या बांधकामास मंजूरी प्रदान केली असून या बांधकामाकरिता ४३.६० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महिला रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला. याबाबत आ. परिणय फुके यांनी पाठपुरावा करुन अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
भंडारा येथील १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०१५-१६ च्या दरसूचीवर आधारित आहे. सदर कामाच्या अंदाजपत्रकामध्ये विद्युतकरण, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, कुंपन भिंत, अंतर्गत रस्ते, मायनर ब्रिज, काँक्रीट ड्रेनेज, रेनवॉटर हॉर्व्हेस्टिंग, फर्निचर, पार्किग व्यवस्था, अग्नि प्रतिबंध उपाययोजना, धर्मशाळा, बाह्यप्रसाधन गृह, जनरेटर, बायोमेडीकल वेस्ट ट्रीटमेंट यासाठी ४३ लाख ८४ हजार रुपयाचे अंदाजपत्रक व आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
आ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिला रुग्णालयाच्या बांधकामाला मंजूरी प्रदान करुन अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ठ करण्याबाबतची मागणी केली होती. शासनाने डॉ. परिणय फुके यांच्या मागणीची दखल घेत भंडारा शहरातील १०० खाटाचे महिला रुग्णालय बांधकामाला मंजूरी प्रदान करुन ४३.६० कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली.
भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखाच्या वर आहे. यामध्ये सात तालुक्यांचा समावेश असून ६६८ गावे समाविष्ट आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांकरिता विशेषत: महिलांकरिता रुग्णसेवा अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे महिला रुग्णांना अनेक गैरसोईना सामोरे जावे लागते. याकरिता महिला रुग्णालयाकरिता जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून ५ आॅगस्ट २०१६ रोजी संचालक आरोग्य सेवा यांचेकडे ४३.६० कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता. अनेक वर्षांपासून भंडारा येथील महिला रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.