कोरोनात जनआरोग्यचा आधार ५०० रुग्णांवर नि:शुल्क उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:39+5:302021-05-20T04:38:39+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय, साकोली उपजिल्हा रुग्णालय, पवनी ग्रामीण रुग्णालय या चार शासकीय रुग्णालयांसह तुमसर येथे दोन, ...
जिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर उपजिल्हा रुग्णालय, साकोली उपजिल्हा रुग्णालय, पवनी ग्रामीण रुग्णालय या चार शासकीय रुग्णालयांसह तुमसर येथे दोन, साकोली एक व भंडारा शहरात चार खासगी रुग्णालयांत या योजनेंतर्गत कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना आदींच्या शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयात या योजनेतून उपचार मोठ्या प्रमाणात केले जातात. परंतु खासगी रुग्णालयामध्ये २० हजार रुपयांचेच पॅकेज असल्याने अनेक डाॅक्टर या योजनेच्या रुग्णांना नकार देतात. अनेकदा तर पहिले पैसे भरा नंतर उपचार करू, असे सांगितले जाते. यावर प्रशासनाचे नियंत्रण दिसत नाही.
शेती विका, व्याजाने पैसे काढा पण पैसे भरा
कोरोनाच्या महामारीत इतरही आजारांचे प्रमाण वाढले आहे; परंतु कोरोनामुळे इतर आजार दडलेले दिसून येते. रुग्णसंख्या वेगाने वाढल्याने रुग्णालयात जागा मिळत नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात सर्व दवाखाने हाऊसफुल्ल होते. त्यावेळी अनेकांनी खासगी रुग्णालयांचा आधार घेतला. तेथे आलेले बिल भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही डाॅक्टरांनी तर शेती विका पण पैसे भरा असे सांगितले.
कोरोना संकटाच्या काळात खासगी डाॅक्टर लूटमार करत असल्याच्या तक्रारी आता येत आहेत. अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे.
...तर करा तक्रार
या योजनेंतर्गत उपचार मिळत नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार करता येते. तसेच योजनेची माहिती व तक्रारीसाठी १५५३८८ या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधता येतो; परंतु अद्याप अशी कोणतीही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली नाही.
अशी करा नोंदणी
या योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्यमित्रांमार्फत नोंदणी करता येते. अंगीकृत रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे कार्यालय असून तेथे आरोग्यमित्र बसलेले असतात. त्यांच्याकडे आधारकार्ड व रेशनकार्ड द्यावे आणि या योजनेची नोंदणी करावी.
नागरिकांचेच होतेय दुर्लक्ष
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी रुग्णनोंदणी करतात; परंतु अनेकांकडे या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेच उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. खासगी रुग्णालयांत तर पैसे भरल्याशिवाय सुटी मिळत नसल्याचे दिसत आहे.