शाळेच्या पहिल्याच दिवशी ५०,१४५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:53 PM2023-06-12T15:53:56+5:302023-06-12T16:28:25+5:30

दीड कोटींचा निधी वाटप : गणवेशाच्या दर्जाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांवर

Free uniforms to 50,145 students on the first day of school | शाळेच्या पहिल्याच दिवशी ५०,१४५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

शाळेच्या पहिल्याच दिवशी ५०,१४५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

googlenewsNext

देवानंद नंदेश्वर

भंडारा : शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतील मोफत गणवेश योजनेअंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षात ५० हजार १४५ पात्र विद्यार्थ्यांना एका गणवेशासाठी ३०० रुपये प्रमाणे १ कोटी ५० लाख ४३ हजार ५०० रुपयांचा निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना ही रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी एक गणवेश संच वितरित करण्याचे निर्देश राज्य प्रकल्प संचालकांनी दिले आहेत, तर गणवेशाच्या दर्जाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांवर सोपविली आहे.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकत असलेल्या ठराविक विद्यार्थ्यांना दोन जोड मोफत गणवेश दिले जातात. मात्र, यंदा सध्या तरी विद्यार्थ्यांना फक्त एकाच गणवेशावर भागवावे लागणार आहे. त्यानुसार, शासनाकडून यंदा पात्र ५० हजार १४५ विद्यार्थ्यांसाठी १ कोटी ५० लाख ४३ हजार ५०० रुपयांचा निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे, पालकांवर शिक्षणाचा बोजा येऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडूनच पुस्तके व गणवेशही दिला जातो. मात्र, गणवेश सर्व मुली, अनुसुचित जाती मुले, अनुसुचित जमाती मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना दिला जातो. दरवर्षी दोन जोड मोफत गणवेश दिले जात असतानाच यंदा मात्र शासनाकडून फक्त एकच गणवेश वाटपाबाबत सूचना आल्या आहेत.

शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेश वाटप करावयाचे असल्याने शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर गणवेशासाठी आलेल्या निधीचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये भंडारा तालुक्याला ७१४२ विद्यार्थ्यांसाठी २१,४२,६०० रुपये, लाखांदूर तालुक्याला ६२२३ विद्यार्थ्यांसाठी १८,७५,९०० रूपये, लाखनी तालुक्याला ५६५३ विद्यार्थ्यांसाठी १६,९५,९०० रूपये, मोहाडी तालुक्याला ७८२८ विद्यार्थ्यांसाठी २३,४८,४०० रुपये, पवनी तालुक्यातील ६६३५ विद्यार्थ्यांसाठी १९,९०,५०० रुपये, साकोली तालुक्याला ६८८३ विद्यार्थ्यांसाठी २०,६४,९०० रुपये, तर, तुमसर तालुक्याला ९७५१ विद्यार्थ्यांसाठी २९,२५,३०० रुपये, असे एकूण ५०,१४५ विद्यार्थ्यांसाठी एक कोटी ५० लाख ४३ हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Web Title: Free uniforms to 50,145 students on the first day of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.