जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियानाचा फज्जा !
By admin | Published: April 15, 2015 12:46 AM2015-04-15T00:46:08+5:302015-04-15T00:46:08+5:30
जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही.
पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली : कृती आराखड्याने काय साध्य होणार?
पवनी : जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही. परिणामी, पावसाळ्यात कोसळणारे पाणी वाहून जात असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद आहे. भंडारा जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.
दरवर्षीच्या उन्हाळ्यात प्रकर्षाने जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने १४ फेब्रुवारी २००२ ला छतावरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत साठविण्यासंदर्भात जलपुनर्भरण मोहिमेसंदर्भात आदेश निर्गमित केले आहे.
विशेषत: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषद, ग्रामपंचायती यासह इतर प्रशासकीय कार्यालयांना हा उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत एकही कार्यालय या उपक्रमाची चोख अंमलबजावणी करताना दिसत नाही.
प्रशासकीय कार्यालयांप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनीही जलपुनर्भरण मोहिमेला दुय्यम स्थान दिले आहे. नव्याने घर उभारताना शेकडो फुट बोअरवेल खोदल्या जात आहेत; पण छतावरून पडणारे पावसाचे पाणी त्यात साठविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळेच पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीवरून वाहून जात आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्याच्या प्रारंभीच अनेकांच्या बोअरवेल, हातपंप, विहिरी कोरड्या पडत आहेत. यावर्षीही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, पाणीटंचाईवर मात करण्याची ही तात्पुरती सोय ठरते. त्यामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जलपुनर्भरणाशिवाय गत्यंतर नसल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)
जलपुनर्भरणाचे महत्त्व
छतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेलजवळ खड्डा खोदून साठविल्यास बारमाही पाण्याकरिता इतर कुठल्याही स्रोतांवर अवलंबून राहावे लागत नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणार्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीची धूप रोखण्यास बहुतांशी मदत मिळते.