मित्रांनीच केला मित्राचा घात
By admin | Published: November 30, 2015 12:41 AM2015-11-30T00:41:56+5:302015-11-30T00:41:56+5:30
येथील शादाब सलीमबेग मिर्झा या युवकाचा पाहूणी येथील नहरात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असला तरी शादाबच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर घातपाताचा आरोप केला आहे.
कुटुंबीयांचा आरोप : चौकशीची मागणी, वरिष्ठांना निवेदन
भंडारा : येथील शादाब सलीमबेग मिर्झा या युवकाचा पाहूणी येथील नहरात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असला तरी शादाबच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर घातपाताचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी शादाबचे वडील सलीमबेग मिर्झा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
येथील संत तुकडोजी वॉर्डातील शादाब सलीमबेग मिर्झा (२४) या युवकाचा ११ आॅक्टोबर रोजी पाहुणी येथील नहरात बुडून मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता त्याला त्याच्या मित्राचा फोन आला. त्यानंतर शादाब हा रोहीत प्रभाकर घोरपडे रा. बैरागीवाडा भंडारा व सुरज जयराम शाहू रा. वरठी यांच्यासोबत सातोना येथे गेला होता.
सातोना येथील एका पान टपरीवर शादाबला त्याची दुचाकी ठेवून देण्याचे सांगत सुरज शाहुच्या स्कुटीवर तिघेही पाहुणी नहराकडे गेले. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यानंतर शादाब नहरात पडला व बुडाला, असे त्याच्या मित्रांचे बयान आहेत. परंतु, त्याच्या मित्रांनीच त्याला नहरात ढकलले, असा आरोप सलीमबेग मिर्झा यांनी केला आहे.
शादाबच्या मित्रांनी एका निर्जनस्थळी शादाबला घेऊन का गेले, शादाबसोबत त्यांचे काय वैमनस्य होते, याबाबत खुलासा व्हायला हवा. पोलिसांनी मित्रांचे फक्त बयान घेऊन सोडून दिले. तेव्हा या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, शादाबच्या मित्रांची नार्काे चाचणी करण्यात यावी, अशी मागणी सलीमबेग मिर्झा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. (नगर प्रतिनिधी)