अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By admin | Published: February 5, 2015 11:02 PM2015-02-05T23:02:39+5:302015-02-05T23:02:39+5:30
आॅक्टोबर महिन्यापासून थकीत मानधन तातडीने देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. दरम्यान उपमुख्य कार्यपालन अधिकारी
भंडारा : आॅक्टोबर महिन्यापासून थकीत मानधन तातडीने देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गुरूवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. दरम्यान उपमुख्य कार्यपालन अधिकारी पी. जे. राठोड यांनी १५ दिवसाच्या आत मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळी ११ वाजता अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने बसस्थानक परिसरातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. सदर मोर्चा राजीव गांधी चौक, नागरी प्रकल्प बालविकास अधिकारी कार्यालय होत थेट जिल्हा परिषदेवर धडकला. येथे प्रवेशद्वारावर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला दिलीप उटाणे, हिवराज उके, सविता लुटे, सदानंद ईलमे, मंगला गजभिये, अल्का बोरकर, गीता लोखंडे, विजया काळे, मंगला गभने, अनिता घोडीचोरे, मनिषा गणवीर यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यपालन अधिकारी राठोड यांच्याशी भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले. राठोड यांनी शिष्टमंडळाला प्रलंबित मानधन १५ दिवसात देण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळाने १५ दिवसात मागण्यांची पुर्तता झाली नाही तर अंगणवाडी कर्मचारी जानेवारी महिन्याचा देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (नगर प्रतिनिधी)