भरपावसात जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:00 AM2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:12+5:30
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने भंडारा शहरात आयटकप्रणीत विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने येथील जिल्हा कचेरीवर भरपावसात मोर्चा काढण्यात आला. येथील त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने भंडारा शहरात आयटकप्रणीत विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने येथील जिल्हा कचेरीवर भरपावसात मोर्चा काढण्यात आला. येथील त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व आयटकचे जिल्हाध्यक्ष माधवराव बांते, कार्याध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव हिवराज उके, उपाध्यक्ष सविता लुटे यांनी केले. या मोर्चात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पाणलोट सचिव समिती कर्मचारी, इमारत बांधकाम, कामगार घरेलू कामगार, विद्युत कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, डाक कर्मचारी, आरोग्य स्त्री परिचर आदी सहभागी झाले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास भरपावसात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला कामगार सहभागी झाल्या होत्या. त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माधवराव बांते होते. या सभेत अंगणवाडी युनियनच्या सविता लुटे, आशा गटप्रवर्तक युनियनच्या भूमिका वंजारी, शालेय पोषण आहारच्या महानंदा नखाते, वीज कर्मचारी फेडरेशनचे नंदकिशोर भड, पोस्टल कर्मचारी युनियनचे टी.एस. लांजेवार, एस.डी. सातपुते, पाणलोट सचिव समितीचे योगेश्वर घाटबांधे, शेतमजूर युनियनचे भूपेश मेश्राम, ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे गजानन लाडसे, इमारत बांधकाम युनियनचे गजानन पाचे, ताराचंद देशमुख यांनी विचार व्यक्त केले. संचालन हिवराज उके यांनी केले. संपामागची भूमिका शिवकुमार गणवीर यांनी सांगितली. आभार राजू बडोले यांनी मानले. यानंतर राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन निवासी जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले. या मोर्चाला राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ येवले यांनी भेट दिली. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सुर्यभान हुमणे यांनी पाठींबा दिला. यशस्वितेसाठी अल्का बोरकर, गौतमी मंडपे, वामनराव चांदेवार, आशिष मेश्राम, पेठे, ठवकर, साखरवाडे, राष्ट्रपाल मेश्राम, राजू लांजेवार, मोनाली सेलोकर यांचे सहकार्य लाभले.