पोषण आहार कर्मचाऱ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 09:33 PM2019-02-17T21:33:47+5:302019-02-17T21:34:23+5:30
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन तर्फे स्थानिक पंचायत समिती कार्यालयावर पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा मोर्चा काढण्यात आला.विविध मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन तर्फे स्थानिक पंचायत समिती कार्यालयावर पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा मोर्चा काढण्यात आला.विविध मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आयटक प्रणित शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनद्वारे स्थानिक बसस्थानकापासून कॉ. शिवकुमार गणवरी, जिल्हा संघटक राजू बडोले, जिल्हा सचिव भाग्यश्री उरकुडे, तालुका अध्यक्ष प्रमिला लसुन्ते यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शापोआ कर्मचाºयांना दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, माधनाऐवजी किमान वेतन लागु करावे, शापोआ कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती तथा सामाजिक सुरक्षा जसे भविष्य निर्वाह निधी पेन्शन आदी लागु करण्यात यावे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. भंडारा यांचे परिपत्रकाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावे, स्वयंपाकी व मदतनीस हे अंशकालीन कर्मचारी आहेत. तेव्हा त्यांच्या कामाचा वेळ ठरवून देण्यात यावे, शापोआ कर्मचाºयात गणवेश, परिचयपत्र देण्यात यावे, काही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्या शालेय पोषण आहार कर्मचाºयांच्या मोर्चा वगैरे सारखे आंदोलनाच्या दिवशी त्यांना कामावर येण्यास सक्ती करतात. हे कामगारांना मिळालेल्या कायदेशिर हक्काचे व संवैधानिक अधिकाराचे उल्लंघन आहे. तेव्हा अशा प्रकारचे व्यवहार करण्याताना सक्त मनाईची ताकीद देण्यात यावे अशा मागण्या निवेदनात स्पष्ट करण्यात आल्यात. मोर्चात तालुका पदाधिकारी वर्षा पडोळे, प्रतिमा कान्हेकर, किरण इस्कापे, तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील पोषण आहार स्वयंपाकीनी सहभागी झाल्या होत्या.