आदिवासी बांधवांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:36 AM2018-04-20T00:36:53+5:302018-04-20T00:36:53+5:30
आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना सोपविल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.
गुरुवारला सकाळी ११.३० वाजता दसरा मैदान येथे मोर्चेकरी एकत्रीत आले होते. येथून सदर मोर्चा आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मडावी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. हा मार्चा गांधी चौक, पोस्टआॅफीस चौक, बसस्थानक चौक होत थेट त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला मोर्चेकरांनी संबोधीत केले. ते म्हणाले, ग्रामीण भागात असलेल्या शासकीय वसतीगृहात व शहरात खाजगी खानावळ नाहीत. रात्रीचे जेवन खाजगी खानावळीकरिता विद्यार्थीनी सायंकाळी ७ नंतर जाणे योग्य नाही. सध्या स्थितीत महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. यादरम्यान विद्यार्थीनीसोबत अनुचूति प्रकार घडल्यास जबाबदार कोण राहणार, विद्यार्थी-विद्यार्थिनींची रक्कम एकाच वेळेस जमा झाल्यास तीन महिन्यांपर्यंत रक्कम टिकून राहतील काय, विद्यार्थ्यांचे बँक खात्यात वेळेवर रक्कम जमा होईल काय असा अनेक समस्या निर्माण होत आहेत.
समाजकल्याण विभागाचे वसतीगृह व इतर मागासवर्गीय वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांना पोटभर जेवन वसतीगृहात देण्यात यावे असा निर्णय आहे. वसतीगृहासाठी वेगळा निर्णय का? हा आदिवासी समाज बांधवावर अन्याय आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहातच जेवण उपलब्ध करुन देण्यात यावे, आदिवासी विकास विभागाने काढलेला निर्णय त्वरित रद्द करुन पुर्ववत भोजनव्यवस्था सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. माजी खा.नाना पटोले यांनी मोर्चेकरांच्या सभास्थळी जावून आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी लढा उभारण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाला नागेश कळपते, अशोक उईके, संतोष मडावी, जि.प. सदस्य उत्तम कळपते, प्रभा पेंदाम, भाग्यश्री उईके, आरती सय्याम, बालेश वरकडे, राम आहाके, शिशुपाल खंडाते, दिनेश मरसकोल्हे, कृष्णा टेकाम, नरेश आचला आदी उपस्थित होते.