साकोलीत समता सैनिक दलाचा मोर्चा
By admin | Published: October 22, 2016 12:27 AM2016-10-22T00:27:35+5:302016-10-22T00:27:35+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर जयंती ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिकरित्या आयोजित न करणाऱ्या ग्रामपंचायतवर कारवाई करून चौकशी करण्यात यावी,..
कारवाईची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
साकोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर जयंती ग्रामपंचायतस्तरावर सार्वजनिकरित्या आयोजित न करणाऱ्या ग्रामपंचायतवर कारवाई करून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी साकोली येथील समता सैनिक दलाच्यावतीने साकोली येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी शतकोत्तर जयंती देशात ग्रामपंचायतस्तरावर साजरी करून त्यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली होती. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे ग्रामपंचायतीने सार्वजनिकरित्या आयोजन केले नाही. या संबंधात १८ मे २०१६ रोजी साकोली समता सैनिक दलाच्यावतीने साकोलीचे खंडविकास अधिकारी यांच्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील दोषीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, राष्ट्रीय महासचिव एम.आर. राऊत, राज्य महिला प्रमुख वासंती सरदार, प्रा. गजेंद्र गजभिये, तालुका उपप्रमुख ज्योती शहारे, तालुका सचिव निशा राऊत यांच्यासह समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)