फरार मोरेश्वर मेश्रामला अटक
By Admin | Published: February 10, 2017 12:27 AM2017-02-10T00:27:15+5:302017-02-10T00:27:15+5:30
शेप महाबचतगटाच्या माध्यमातून विदर्भात हजारो लोकांना कोट्यवधीने गंडा घातल्यानंतर फरार झालेला आरोपी
चार महिन्यांपासून होता फरार : हजारो लोकांना कोट्यवधीने गंडविले
भंडारा : शेप महाबचतगटाच्या माध्यमातून विदर्भात हजारो लोकांना कोट्यवधीने गंडा घातल्यानंतर फरार झालेला आरोपी मोरेश्वर रामाजी मेश्राम (५२) याला नागपूर येथील मेडिकल चौकातून गुरूवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूर व भंडारा पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मेश्रामला भंडारा येथे आणण्यात आले.
सन २००५ मध्ये मोरेश्वर मेश्राम यांनी अभिनय अभिरूची कला व बहुउद्देशिय संस्था गडचिरोली द्वारा संचालित शेप महाबचतगटाची स्थापना केली. या महाबचतगटात संयोजक, शाखा व्यवस्थापक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक अशी साखळी निर्माण केली. त्यानंतर कर्मचाऱ्याच्या माध्यमातून खातेदाराकडून दरमहा ६० ते ४९९ रूपयापर्यंत आर.डी. च्या नावावर पैसे वसूल केले. यासोबतच ५०० रुपये ते १० हजार रूपयांपर्यंत मुदत ठेवी जमा करून ते पैसे शेप महाबचतगटाच्या मुख्य कार्यालयात आणले जायचे. या रकमेतून मोरेश्वर मेश्राम यांनी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात कार्यालये उघडले. पूर्व विदर्भात ५५० एजंट नेमून एक लाखाच्यावर सदस्य तयार केले. खातेदारांशी तोंडी करार करून पैशांची गुंतवणूक करण्यासाठी मेश्राम यांनी प्रोत्साहित केले. दामदुप्पट लाभ व दरमहा ५० रूपये गुंतवणूक करेल त्याला साडेसात वर्षात ५० हजार रूपयांचा लाभ देण्याचे आमिष दिले.
त्यानंतर मेश्राम यांनी शेप एंटरटेनमेंट, शेप अॅग्रो, एस व्हीजन, प्रिंट मेल अॅण्ड कम्युनिकेशन अशा चार व्यावसायिक कंपन्या सुरु केल्या. जनतेचा पैसा या व्यवसायात वळता केले. काही पैशातून गणेशपूर, धारगाव, आलेसूर, खैरी, पानोड, झाडगाव अशा विविध ठिकाणी चल अचल संपत्ती तयार करून गुंतवणूक केली. परंतु ज्या लोकांनी शेप महाबचत गटात गुंतवणूक केली त्या लोकांना पैशांचा मोबदला न मिळाल्यामुळे संतप्त ग्राहकांनी मोरेश्वर मेश्रामविरूद्ध भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, वरठी, दिघोरी, अड्याळ, जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. तक्रारीवरून त्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर त्याने अटकपूर्व जामिन मिळविला होता. याप्रकरणी अनिता गणवीर रा.तकिया वॉर्ड भंडारा यांनी जामिन मिळू नये यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला. तेव्हापासून मोरेश्वर मेश्राम फरार होता.
दरम्यान, आज गुरूवारला या प्रकरणातील पीडित लोकांना मोरेश्वर मेश्राम यांचे वाहन नागपुरात मेडीकल चौकात दिसले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो एका दुकानात बसून असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली. तोपर्यंत भंडारा पोलिसांनी नागपूर पोलिसांना माहिती देऊन तिथे असलेल्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी मोरेश्वर मेश्रामला ताब्यात घेतले. त्यानंतर पहिले अजनी पोलीस ठाण्यात नेले. भंडारा पोलीस नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी मेश्रामला ताब्यात घेऊन भंडारा येथे आणले. मोरेश्वर मेश्रामला भंडारा येथे आणण्यात आल्याची माहिती होताच शेकडो पीडित लोकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोर गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुरेश धुसर हे व त्यांची चमू करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)