कार्यानुभव निदेशकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:29 PM2018-11-14T22:29:43+5:302018-11-14T22:29:58+5:30
विद्यार्थ्यांमधील कौशल्याला चालना देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची नियुक्ती केली. मात्र आजही हे निदेशक अत्यल्प मानधनावर राबत आहेत. न्यायालयाने निर्णय देऊनही शासन मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे भंडारा येथील कला क्रीडा व कार्यानुभव निदेशकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्यार्थ्यांमधील कौशल्याला चालना देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची नियुक्ती केली. मात्र आजही हे निदेशक अत्यल्प मानधनावर राबत आहेत. न्यायालयाने निर्णय देऊनही शासन मागण्या मान्य करीत नाही. त्यामुळे भंडारा येथील कला क्रीडा व कार्यानुभव निदेशकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
राज्य शासनाने कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांचे २०१२-१३ मध्ये नियुक्ती केली. त्यात पाच महिने व दहा महिने कालावधीत पाच ते सात च्या वर्गासाठी शिक्षक देण्यात आले. कालांतराने या निदेशकांना पुन्हा शाळेवर घेतले नाही. या काळात निदेशकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. निदेशकांच्या बाजूने निकालही देण्यात आला. कायमस्वरुपी अर्धवेळ असा निकाल दिला. परंतु राज्य शासनाने अंशकालीन निदेशकांना कायमस्वरुपी नियुक्ती न देता नवीन शासन निर्णय काढून न्यायालय नियमांची पायमल्ली केली. या निदेशकांना प्रतितास ५० रुपये ४८ तासिकेच्या मर्यादेत मानधन अनुज्ञेय आहे. निदेशकांना मोजक्या मानधनात काम करावे लागत असून केंद्र शासनाने २० जानेवारीच्या पत्रकानुसार सात हजार रुपये मासिक मानधन मान्य केले आहे. तरीसुद्धा राज्य शासन मानधन देताना ७ आॅक्टोबर २०१५ चाच शासन निर्णय पुढे करीत आहे. अगदी अल्प मानधनात राबणाऱ्या या निदेशकांवर आता उपासमारीची पाळी आली आहे.
शासन सेवेत नियमित करावे, मानधनात वाढ करावी, नियुक्ती पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत करावी, सेवाज्येष्ठता प्रदान करावी, पहिली ते आठवी अंशकालीन अतिथी निदेशकांची नियुक्ती करावी अशा मागण्यांसाठी मंगळवारपासून निदेशक येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहे. यामध्ये सतीष पटले, तुफानसिंह चव्हाण, महेंद्र हाडगे, मनोहर गौपाले, गणेश झिंगरे, विलास झलके, सविता बन्सोड, हर्षा नंदनवार, सुरेश भैसारे, विनोद कातोरे, नेकराज वझाडे, चुडाराम ठाकरे, जगदीश पडोळे, संतोष लांजेवार, ज्योती टेंभरे, योगेश निपाने, जयश्री गोंधुळे, शेषराव शेंडे, केशव सरजारे, मुकेश जांगळे, फुल्लके आदींचा समावेश आहे.