पाच दिवसांपासून मध्यवर्ती बँकेत निधीचा ठणठणाट
By Admin | Published: February 14, 2017 12:14 AM2017-02-14T00:14:53+5:302017-02-14T00:14:53+5:30
गत बुधवारपासून बँकेत एक दमडीही उपलब्ध नसल्याने ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या येरझाऱ्या माराव्या लागत आहे.
ग्राहकांसह शेतकरीही हतबल : गोबरवाही येथील प्रकार
तुमसर : गत बुधवारपासून बँकेत एक दमडीही उपलब्ध नसल्याने ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या येरझाऱ्या माराव्या लागत आहे. हा प्रकार तालुक्यातील नाकाडोंगरी येथील भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅफ बँक शाखेत पाहायला मिळत आहे. परिणामी स्वत:चे पैसे स्वत:लाच मिळत नसल्याने बँकेला कुलूप का ठोकू नये, असा प्रतिसवाल ग्राहक उपस्थित करीत आहेत.
८ नोव्हेंबर २०१६ ला देशात नोटबंदी झाली. ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे फरमान सरकारने सोडले. त्यावरुन होते नव्हते तेवढीही रक्कम ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅप. बँकेत जमा केले. त्यावेळी पैसे विड्रॉल करण्याची मर्यादा ठरवलेली होती. त्यावेळी देखील सदर बँकेने एक हजार रुपयांवर कोणत्याही ग्राहकांना विड्राल दिले तर नाहीच उलट चारचार दिवस ग्राहकांना बँक जागून काढावी लागत असल्याची वास्तववादी चित्र होते.
आज नाही ५० दिवसानंतर स्थिती पुर्वपदावर येईल या आशेने ग्राहकांनी ते निमुटपणे सहन केले. पंरतु आता १२० दिवसांचाही कालावधी लोटला व सरकारने विड्रालची मर्यादा देखील वाढविली परंतु भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को- आॅफ बँक नाकाडोंगरी च्या शाखेने एक हजार रुपयाच्या वर विड्राल दिले नाही. आजघडीला गत बुधवारपासून बँकेत एक रुपयाही विड्राल देण्यासाठी उपलब्ध नसल्याने शेकडो ग्राहक व शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. समस्येचे निवारण न झाल्यास संतप्त गावकऱ्यांतर्फे बँकेला कुलूप ठोकण्याचा ईशारा देण्यात आलेला आहे. (शहर प्रतिनिधी)