भैयालाल भोतमांगे यांच्यावर अंत्यसंस्कार
By admin | Published: January 22, 2017 12:19 AM2017-01-22T00:19:58+5:302017-01-22T00:19:58+5:30
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात मोहाडी तालुक्यातील देऊळगाव या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
भंडाऱ्यात शोकसभा : शोकाकूल वातावरण
भंडारा : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात मोहाडी तालुक्यातील देऊळगाव या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
भैयालाल भोतमांगे यांचे शुक्रवारला हृदयविकाराने नागपुरात निधन झाले. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव भंडारा येथे आणण्यात आले होते. न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी मोठा संघर्ष केला. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच त्यांच्या निधनामुळे एका संघर्षाची अखेर झाल्याची भावना आंबेडकरी अनुयायांमधून व्यक्त होत होती.
कुटुंबीयांच्या समाधीशेजारीच केले अंत्यसंस्कार
२९ सप्टेंबर २००६ च्या रात्री झालेल्या हत्याकांडात भोतमांगे कुटुंंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पत्नी सुरेखा, मुलगा सुधीर व रोशन मुलगी प्रियंका यांच्या पार्थिवावर देऊळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या समाधी शेजारीच भैयालाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेनंतर भैयालाल यांच्या न्यायाच्या संघर्षात संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांच्या पाठिशी होता. त्यांच्या अखेरच्या क्षणी सुद्धा याच सहकाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला.
११ वर्षापूर्वी घडले होते अमानुष हत्याकांड
२९ सप्टेंबर २००६ रोजी मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या छोट्याशा गावातील भोतमांगे कुटुबीयांवर गावातील काही लोकांकडून अमानुष हत्या केली होती. आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची अमानुष हत्या केली होती. या हत्याकांडाचे पडसाद विधीमंडळापासून संसदेपर्यंत उमटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभर आंदोलनाचे लोण पसरले होते. घटनेनंतर सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि १५ महिने चाललेल्या या खटल्याचा निकाल १५ सप्टेंबर २००८ रोजी लागला. याप्रकरणी न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरविले. न्यायासाठी यांनी अखेरपर्यंत लढा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यामुळे चळवळीला हानी पोहोचली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)