अंत्ययात्रेत सहभागींवर मधमाशांचा हल्ला, ३० जण जखमी; नागरिकांत दहशत
By युवराज गोमास | Published: October 7, 2023 04:10 PM2023-10-07T16:10:52+5:302023-10-07T16:11:37+5:30
पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील घटना
भंडारा : पवनी तालुक्यातील कोदूर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारकसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना ६ ऑक्टोंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी घडली. यात २५ ते ३० नागरिक किरकोळ जखमी झाले तर ५ नागरिकांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले.
होमगार्ड असलेले नाना मेश्राम यांची आई अजनाबाई मेश्राम यांचे गुरुवारला रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर कोदुर्ली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व ग्रामस्थ स्मशानभूमीकडे जात असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात २५ ते ३० नागरिक किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी झालेले नातेवाईक व ग्रामस्थांनी ग्रामीण रूग्णालय व खासगी रुग्णालय गाठून उपचार सुरू केला आहे.
ग्रामीण रुग्णालयात सिंधू चव्हाण, सुशीला बनसोड, सुभाष चव्हाण, शुभम रामटेके, घनश्याम खोब्रागडे यांच्यावर उपचार करण्यात आले. मधमाशांचा हल्ला थांबल्यानंतर मोजक्याच नागरिकांच्या पुढाकारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे नागरिकांची चांगली दमछाक झाली, एवढे मात्र खरे! जखमींच्या प्रकृतीत सुधारणा असल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली आहे.
नदीतील पाण्यात, तणसीच्या ढिगांत लपले नागरिक
हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळू लागले. यामुळे एकच खळबळ उडाली. स्मशानभूमीपासून काही अंतरावर प्रेत ठेवून काही नागरिक गावाच्या दिशेने तर काही जवळील तणसीच्या ढिगात लपले. काहींनी वैनगंगा नदीचे पाण्याचा उडी घेतली. परंतु, बराच वेळ मधमाशांनी पिच्छा सोडला नव्हता. त्यामुळे नागरिक चांगलेच घाबरले होते.
जिल्ह्यात १३ दिवसातील दुसरी घटना
तुमसर तालुक्यातील सालई शिवारात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शुभंम भोयर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर बाम्हणी नदीघाट स्मशानभूमी शेजारी मधमाशांनी अचानक हल्ला केला होता. २३ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत सुमारे २०० नागरिक जखमी झाले होते. नागरिकांनी वैनगंगेत उडी घेत बचाव केला होता. आता १३ दिवसानंतर पुन्हा अंत्ययात्रेवर हल्ला केल्याची ही दुसरी घटना जिल्ह्यात घडली.