धक्कादायक! भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गाेळ्या आढळल्या बुरशीयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 04:43 PM2022-04-26T16:43:33+5:302022-04-26T17:06:08+5:30
वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने माेठा अनर्थ टळला.
भंडारा : जिल्हा आराेग्य प्रशासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना जंतनाशक गाेळ्या वितरित करताना भंडारा तालुक्यातील खरबी येथे बुरशीयुक्त गाेळ्या आढळण्याचा धक्कादायक प्रकार साेमवारी उघडकीस आला. या प्रकाराने आराेग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेतली. या बुरशीयुक्त स्ट्रिपमधून सात विद्यार्थ्यांना गाेळ्या देण्यात आल्या असून त्यांच्यावर आराेग्य विभाग लक्ष ठेवून आहे. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने माेठा अनर्थ टळला.
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील एक ते १९ वर्ष वयाेगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गाेळ्या वितरणाची माेहीम साेमवारपासून सुरू झाली आहे. भंडारा तालुक्यातील खरबी येथील विकास विद्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जंतनाशक गाेळ्या वितरण सुरू हाेते. या शाळेत ४५० गाेळ्या वितरणासाठी आराेग्य विभागाने दिल्या हाेत्या. अकराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना गाेळ्या वितरित करीत असताना एका स्ट्रिपमध्ये काही गाेळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. गाेळ्या वितरण थांबवून मुख्याध्यापक सुधाकर देशमुख यांनी तत्काळ आराेग्य विभागाला माहिती दिली.
तालुका आराेग्य अधिकारी एम. पी. माेटघरे तत्काळ चमूसह दाखल झाले. त्यांनी चाैकशी केली असता बॅच नं. एईटी २१६ मध्ये तीन गाेळ्या बुरशीयुक्त असल्याचे आढळून आले. यानंतर या स्ट्रीपमधून गाेळ्या दिलेल्या सात विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी करण्यात आली. मात्र काेणालाही काेणतीच लक्षण आढळून आली नाही. मात्र या प्रकाराने जिल्ह्याच्या आराेग्य विभागात एकच खळबळ उडाली.
सात विद्यार्थ्यांवर आराेग्य विभागाचा वॉच
बुरशीनाशक गाेळ्या असलेल्या स्ट्रीपमधून सात विद्यार्थ्यांना गाेळ्या देण्यात आल्या. त्यात पुष्पा रंगारी, साक्षी निखाडे, आचल उकरे, पायल बेले, अभिलाष धकाते, संयुक्ता मडावी, मयूर वाडीभस्मे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी करण्यात आली. सुदैवाने काेणतीही लक्षण आढळून आली नाही. त्यांच्यावर आराेग्य विभाग वॉच ठेवून आहे. वर्गशिक्षक पी. जे. शेंडे यांनी या गाेळ्या वितरित केल्या. मात्र या सात विद्यार्थ्यांना दिलेल्या गाेळ्या बुरशीयुक्त नव्हत्या. फक्त तीन गाेळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या.
भंडारा जिल्ह्यात जंतनाशक गाेळ्या कमी पडत असल्याने हिंगाेली येथून मागविण्यात आल्या. खरबी येथे बुरशीयुक्त गाेळ्या आढळल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. इतर ठिकाणी असा प्रकार झाला काय, याचा शाेध घेत आहे. सुदैवाने खरबी येथे कुणालाही या गाेळ्यामुळे बाधा झाली नाही.
डाॅ. मिलिंद साेमकुंवर, जिल्हा आराेग्य अधिकारी, भंडारा