'ग्रीप'विनाच रोहित्रातून जीवघेणा वीज प्रवाह
By admin | Published: September 20, 2015 12:56 AM2015-09-20T00:56:33+5:302015-09-20T00:56:33+5:30
परिसरात वीज वितरण कंपनीचा कारभार सैरवैर झालेला आहे. साहित्य अभावी ग्रीपविनाच रोहित्रमधून वीज प्रवाह सुरु असून, ...
चुल्हाडात म्हैस ठार : वारंवार विजेचा लपंडाव, गावकरी त्रस्त
चुल्हाड (सिहोरा) : परिसरात वीज वितरण कंपनीचा कारभार सैरवैर झालेला आहे. साहित्य अभावी ग्रीपविनाच रोहित्रमधून वीज प्रवाह सुरु असून, विजेच्या धक्क्याने चुल्हाडात म्हैस ठार झाली आहे. त्यामुळे नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.
विजेचा लपंडाव, साहित्यांचा अभाव, नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष यामुळे सिहोरा येथील वीज वितरण कंपनीचा कार्यालय चर्चेत आलेला आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांचा यात दोष नसतांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. या कार्यालयात सिहोरा १ आणि सिहोरा २ अशी विभागणी करण्यात आली आहे. या विभागांना स्वतंत्र यंत्रणा संचालित करीत आहे.
३३/११ केव्हीचे केंद्र मोठ्या आंदोलनाने प्राप्त झाले आहे. नागरिकांना सिंगल फेज व शेतकऱ्यांना थ्री फेज अशी वीज जोडणीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे परिसरात नागरिकांना भारनियमनातून मुक्ती मिळाली आहे. परंतु शेतकरी पुरता खचला आहे. २४ पैकी ८ तास वीज पुरवठा शेतकऱ्यांचे पंपाला होत आहे. यामुळे नळ योजनांचे नियोजन ढासळले आहे.
थ्री फेज वीज पुरवठ्याच्या कक्षात या नळ योजना आहेत. पिण्याचे पाणी आणि शेतीचे उत्पादन भारनियमनाच्या गणितावर अवलंबून आहे. दरम्यान रोहित्राची अवस्था वाईट झाली आहे. या रोहित्रांना ग्रीप नाहीत. थेट फ्युज तार जोडली जात आहेत. हां प्रकार जीवघेणा असताना कुणी पुढारी बोलते होत नाहीत. ग्रीप नसल्याने कधीही वीज पुरवठा खंडीत होत आहे. गावातील काही अनुभवी तरुण ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
वीज आता गरज झाल्याने अप्रशिक्षित तरुणाचा जीव वेशीवर टांगल्या जात आहे. निश्चितच वीज वितरण कंपनी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव आहे. जनमित्रांना अनेक गावांचा कारभार असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे.
या कार्यालयात तक्रार अथवा गाऱ्हाणे सांगीतली असता, साहित्य नसल्याचे ऐकविण्यात येत आहे. हे सत्य असले तरी अशा उत्तराने समस्या निकाली निघणार नाही. चुल्हाडात शेतकरी नंदू पारधी गावाचे शेजारी जनावरे चारत असताना रोहित्रानजिक संपूर्ण जागेला करंट होते. या विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यांची म्हैस जागीच ठार झाली आहे.
यात ५० हजाराचे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा आधार हिरावला आहे. या धक्क्यात शेतकरी नंदू पारधी हे थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती वीज वितरण कंपनी कार्यालयात देण्यात आली आहे. (वार्ताहर)