भरधाव टिप्परने महिलेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:22 AM2018-06-13T01:22:22+5:302018-06-13T01:22:27+5:30
खुनारी येथून कामे आटोपून दुचाकीने आई व मुलगा दुचाकीने चिचटोला येथे स्वगावी जात असताना मुरमाडीकडून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : खुनारी येथून कामे आटोपून दुचाकीने आई व मुलगा दुचाकीने चिचटोला येथे स्वगावी जात असताना मुरमाडीकडून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारला दुपारी १ वाजता कोलारी येथे घडली.
हिराबाई यशवंत नेवारे (५५) रा.चिचटोला असे मृत महिलेचे नाव असून मुलगा ईश्वर यशवंत नेवारे (३०) हा गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर भंडारा येथे उपचार सुरू आहेत. ईश्वर नेवारे हा दुचाकी क्रमांक (एमएच /३६ सी २९६) ने आईला घेऊन खुनारी येथे गेला होता. तिथे काम आटोपून परतीच्या प्रवासात कोलारी येथे टिप्पर क्रमांक (एमएच ४० /वाय ६०००) ने त्यांना धडक दिली.
यात हिराबाई टिप्परच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात जखमी ईश्वरवर लाखनी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आले. याप्रकरणी पालांदूर पोलिसांनी टिप्परचालक मनोज मारोती डुंबरे (२८) रा.वलनी, जि. नागपूर याला अटक केली असून तपास ठाणेदार अंबादास सुनगार हे करीत आहेत.
चुलबंध नदीतून रेतीची तस्करी सुरूच
रेतीची रात्रंदिवस टिप्पर, ट्रॅक्टरने तस्करी सुरू आहे. नफेखोरीकरिता गोसेखुर्द कालव्यावर नियमबाह्य टिप्पर भरवस्तीतून धावत आहे. पालांदुरातून चारही दिशेने रेतीची जडवाहतूक नियमांचे उल्लंघन करून धावत आहे. मात्र याकडे तहसील प्रशासन, खनिकर्म विभाग, वाहतूक पोलिसांचे लक्ष जावूनही कुणी कारवाई करीत नाही. रेती तस्करांचे अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंधामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. अख्खी चुलबंद नदी रेती तस्करांनी घशात घातली आहे. मात्र जिल्हा प्रशासन निद्रिस्त आहे. हिराबाई नेवारे यांच्यासारख्यांचे निष्पाप जीव जावूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. आणखी किती जणांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.