शिक्षणाला संस्काराची जोड देऊन यश गाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 09:57 PM2018-11-27T21:57:23+5:302018-11-27T21:57:51+5:30
जीवनात यश-अपयश येत जात राहतात. अपयश मिळाले म्हणून खचू नका आणि यश डोक्यात जाऊ देऊ नका. आयुष्यात मिळालेले फळ प्रयत्नावर अवलंबून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जीवनात यश-अपयश येत जात राहतात. अपयश मिळाले म्हणून खचू नका आणि यश डोक्यात जाऊ देऊ नका. आयुष्यात मिळालेले फळ प्रयत्नावर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कुठेही कमी नाही किंवा शहरी भागातील विद्यार्थी हा मागे नाही. प्रगतीचा आलेख हा आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे. शिक्षणावर होणारा खर्च हा आपल्या पालकाच्या कष्टाची किंमत आहे. शिक्षणाला संस्काराची जोड देऊन यश गाठा, असे आवाहन जिल्हा परिषद भडाराचे शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.
जिल्हा परीषद शिक्षण विभागातर्फे अखील सभागृह भंडारा येथे मार्च २०१८ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण समिती सभापती रेखा ठाकरे, बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ कायते, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एल. एस. पाच्छापुरे व उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे उपस्थित होते.
यावेळी भंडारा जिल्ह्यातील मार्च २०१८ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे सत्कार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. यात उच्च माध्यमिक गटात जिल्ह्यातील नऊ शाळेतील २१ व माध्यमिक गटात ४३ शाळेतील २४० विद्यार्थ्यांचा समावेश होता. मार्च २०१८ च्या शालांत वार्षिक परीक्षेत माध्यमिक गटात जिल्ह्यातील १९,०५४ विद्यार्थ्यांपैकी १६,५०८ व उच्च माध्यमिक गटातील १८,५४४ विद्यार्थ्यांपैकी १६,४५५ विद्याार्थी उत्तीर्ण झाले होते. यापैकी जिल्ह्यातील विविध शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून २६१ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले होते. त्या २६१ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षणाधिकारी एल. एस. पाच्छापूरे यांनी शिक्षणाचे विविध पैलू समजावून सांगितले. कौतुकाची थाप पाठीवर सहजासहजी मिळत नाही. कौतुक हे प्रयत्नांशिवाय प्राप्त होत नाही. परीक्षेच्या काळात पालक व विद्यार्थ्यांच्या संवेदना वाढतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यासाठी सुरुपासून प्रवूत्त करावे.
संचालन मुकुंद ठावकर व स्मिता गालफाडे, प्रास्ताविक शिक्षणाधिकारी एल. एस. पाच्छापुरे व आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी राजभोज भांबोरे, मुकेश मेश्राम, जगदीश उके, विनायक वंजारी, मोहाडीचे कनिष्ठ विस्तार अधिकारी विभावरी पडोळे, अशोक भानारकर सहकार्य केले.
निर्बंध यशाला रोखू शकत नाही
शालेय जीवन हे निर्बंधांनी व्यापलेले आहे. १० व १२ वी वर्गात गेलो की अनेक निर्बंध लादल्या जातात. परीक्षांचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांचे जीवन जाचक सूचनांवर चालते. पण निर्बंध न लादता यश मिळवता येते, असे मत जिल्ह्यातून १२ वीच्या परीक्षेत दुसरे स्थान पटकाविणाऱ्या हिमाली घोडमारेने सिद्ध करून दाखवले. विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करताना हिमालीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आठ वेळा सुवर्णपदक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन १२ वीच्या परीक्षेत यश गाठले असल्याचे सांगितले.