किटसाठी कामगारांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:35 PM2019-07-29T22:35:25+5:302019-07-29T22:35:47+5:30
येथील पंचायत समितीत बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. रात्री दोन वाजतापासून रांगा लागत असल्यामुळे अनेक लोकांना भोवळ येऊन कोसळल्याचे प्रकार वाढत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका कामगारांवर पडत आहे. त्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून त्यांची फारच गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील पंचायत समितीत बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. रात्री दोन वाजतापासून रांगा लागत असल्यामुळे अनेक लोकांना भोवळ येऊन कोसळल्याचे प्रकार वाढत आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका कामगारांवर पडत आहे. त्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून त्यांची फारच गैरसोय होत आहे.
सहा-सात गावातील कामगारांना एकाच दिवशी बोलविण्याऐवजी दररोज एका गावातील मजुरांना बोलाविले किंवा नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कामगारांची नोंदणी करून बांधकाम किट वाटप केली. तर कामगारांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी अनेक कामगारांनी केली आहे. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी संपूर्ण कागदपत्रासह मोहाडी पंचायत समितीमध्ये येतात. त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना या योजनेतील पहिला लाभ बांधकाम किट (पेटी) वाटप केली जाते. मात्र नोंदणी करण्यासाठी जवळपास ५०० ते ६०० कामगार एकाच दिवशी उपस्थित होतात. त्यामुळे या कामगारांना रांगेत उभे केले जाते. रांगेत पहिला नंबर लागावा म्हणून ग्रामीण भागातील काही कामगार अर्ध्या रात्रीलाच येऊन आपला नंबर लावतात. नोंदणीची प्रक्रिया दहा वाजता सुरू होत असल्याने या कामगारांची नोंदणी रात्री सात ते आठ वाजतापर्यत सुरू असते. पहाटेपासून आलेले महिला पुरुष कामगार रांगेत उपाशीतापाशी तासन्तास उभे राहत असल्यामुळे ते बेशुद्ध पडतात. ही योजना राबविताना प्रशासनाने मजुरांच्या सोयीसाठी मंडपाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र जनतेला भुरळ घालण्याच्या उद्देशाने ही योजना जोमाने राबविण्यात येत आहे. परंतु कामगारांच्या सोयी सुविधेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. पाच ते सहा गावातील मजुरांना एकाच दिवशी बोलाविण्यात येत असल्याने सहाजिकच गर्दी वाढणार हे प्रशासनाच्या लक्षात न येणे ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल.
प्रशासनाने पाच-सहा गावातील मजुरांना एकाच दिवशी न बोलाविता दररोज एका एका गावातील मजुरांना नोंदणीकरिता बोलवावे, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी , पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी उपस्थित कामगार केली आहे.
महिला व पुरुषांना एकच मार्ग
नोंदणीसाठी ज्या खोलीत जावे लागते त्या दारातून महिला व पुरुष एकाच वेळी प्रवेश करीत असल्याने व मोठी गर्दी असल्याने धक्का बुक्की होऊन महिलांची मोठी गैरसोय होत आहे. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे द्वार ठेवण्यात यावे जेणेकरून महिलांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचे आहे.
बेशुद्ध होऊन कोसळल्या अनेक महिला
कामगार नोंदणीकरिता आपला नंबर लवकर लागावा, यासाठी अनेक महिला पहाटेला येऊन रांगेत लागतात. काही महिला लहान लहान मुलांना घेऊन रांगेत उभ्या राहतात. भूक-तहान लागली तर या महिला आपली जागा सोडून जाण्यास तयार नसतात, उन्हामुळे व पोटात काहीच नसल्याने अनेक महिला बेशुद्ध होऊन खाली पडल्याचे प्रकार घडले आहे, यात निशा बारई (२५) पिंपळगाव, उषा कारेमोरे (४१) आंधळगाव, ममता चोपकर (२५) पिंपळगाव या महिला बेशुद्ध पडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे दाखल करण्यात आले होते. तर प्रमोद गौतम शेंडे याला प्रकृती जास्त खालावल्याने भंडारा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे
पोलिसांनी दाखविली माणुसकी
कामगारांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मोहाडी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळपासून उपाशीतापाशी रांगेत उभ्या असलेल्या महिलांची समस्या जाणून येथील ठाणेदार निलेश वाजे यांनी या महिलांची आस्थेने विचारपूस करून सर्व महिलांसाठी ग्लुकोज बिस्किटांचे वाटप करून माणुसकीचा परिचय दिला.