समाजप्रबोधन, आधुनिकतेचा संदेश देणारा ‘गणराय’
By admin | Published: September 25, 2015 12:08 AM2015-09-25T00:08:41+5:302015-09-25T00:08:41+5:30
धार्मिक उत्सव, सण म्हटलं की, समाजप्रबोधन तर दूरचं. मात्र, वर्गणी गोळा करून कार्यक्रम घेणारे पदाधिकारी डोळ्यासमोर उभे राहतात.
लोकमत शुभवर्तमान : मोहगाव (देवी) येथील वर्गणी गोळा न करणारे मंडळ
प्रशांत देसाई भंडारा
धार्मिक उत्सव, सण म्हटलं की, समाजप्रबोधन तर दूरचं. मात्र, वर्गणी गोळा करून कार्यक्रम घेणारे पदाधिकारी डोळ्यासमोर उभे राहतात. याबाबीला फाटा दिला तो, मोहाडी तालुक्यातील मोहगाव (देवी) येथील एका मंडळाने. त्यांनी स्थापित केलेली मुर्ती आधुनिक तंत्रज्ञानाचा संदेश देणारी असून गावात वर्गणी गोळा न करता मंडळाच्या सदस्यांनी सर्व खर्च वाटून घेत गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. मंडळाचा हा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
मोहगाव (देवी) हे ३,५०० लोकवस्तीचे गाव. येथील हनुमान व्यायाम मंडळाचे पदाधिकारी हा गणेशोत्सव साजरा करतात. मागील १२ वर्षांपासून व्यायाम मंडळाच्या खोलीत गणरायाची स्थापना करण्यात येते. यावर्षी पाळण्यावर विराजमान असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून या मंडळाने आजपर्यंत दुष्काळ परिस्थिती, वाहतुकीची समस्या यासोबतच समाजातील वाईट चालीरिती, प्रथा, परंपरा, स्त्री भ्रुणहत्या, हुंडाबळी याशिवाय महिलांवरील अत्याचार यावर आधारित देखावे किंवा नाटिका साजरे करून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी मंडळाने श्रींच्या माध्यमातून आधुनिकतेचा देखावा तयार केला आहे.
पाळण्यावर विराजमान गणरायाच्या एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात टिव्हीचा रिमोट कंट्रोल असून त्यांच्यासमोर असलेल्या टिव्हीवर प्रबोधनात्मक कार्यक्रम किंवा ताज्या घडामोडीसाठी वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या बातम्या सुरू राहतात. सोबतच एका बाजूला वृत्तपत्र व लॅपटॉप ठेवण्यात आले आहे. या आधुनिक देखाव्यातून समाजाने बोध घ्यावा, जणू असाच संदेश गणराया देत असल्याचा भास होतो. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची कामे करण्याची सुचना द्यावी लागत नाही, ते स्वत:ची जबाबदारी ओळखून सर्व कामे करतात.
गणेशोत्सवादरम्यान सर्व सदस्य झेपेल एवढा खर्च उचलून गणरायाची आराधना करतात. उत्सवादरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकदाच २१ रूपये देऊन प्रवेश घेतल्यानंतर सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याची स्पर्धकांना संधी मिळते. विजेत्यांना बक्षीस देण्यात येते व महाविजेत्या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाते.
दरम्यान रक्तदान, नेत्रदान, रक्तगट तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येते. मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मारबते, उपाध्यक्ष अमित डोकरीमारे, सचिव संजय वाडीभस्मे तर मार्गदर्शक प्रकाश काळे, रामकृष्ण चकोले, नरेश दिपटे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ गणेशोत्सवासाठी सहकार्य करीत आहेत. या मंडळाने साजरा केलेला हा आधुनिक युगातील गणेशोत्सव खरोखरचं समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.