१०० च्या नोटावर दोन्ही बाजूंनी गांधीजींची प्रतिमा
By admin | Published: February 10, 2017 12:29 AM2017-02-10T00:29:22+5:302017-02-10T00:29:22+5:30
नोटाबंदीनंतर कधी चिल्लरचा तुटवडा तर कधी मोठ्या नोटांचा तुटवडा अशा घटना ऐकिवात होत्या.
भंडाऱ्यातील प्रकार : एटीएममधून निघाली नोट
भंडारा : नोटाबंदीनंतर कधी चिल्लरचा तुटवडा तर कधी मोठ्या नोटांचा तुटवडा अशा घटना ऐकिवात होत्या. तसेच नवीन नोटांच्या चलनानंतर बऱ्याचदा प्रिंटींग मिस्टेकही उघडकीला आल्या. अशीच घटना आज भंडाऱ्यात उघडकीला आली. एटीएम मधून नोटा निघाल्यानंतर त्यातील शंभराच्या एका नोटावर दोन्ही बाजूंनी महात्मा गांधीजींचे चित्र होते. तसेच एका बाजूवरील १०० चे आकडेही उलटे आहेत.
भंडारा तालुक्यातील पिंडकेपार (कोरंभी) येथील रहिवासी सुधाकर साठवणे हे राजीव गांधी चौकात स्थित युनीयन बँकेच्या एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी गेले होते. त्यांनी ६ वाजून २ मिनिटांनी दोन हजार रुपयांचे विड्रॉल एटीएम मधून केले.
यावेळी त्यांना ५०० रुपयांच्या तीन व शंभर रुपयांच्या पाच नोटा मिळाल्या. त्यापैकी शंभराची एक नोट यावर दोन्ही बाजूंनी गांधीजींचे चित्र असल्याचे दिसून आले.
याची माहिती त्यांनी तिथे उपस्थितांनाही दिली. तसेच या नोटवर गव्हर्नरच्या दोन स्वाक्षऱ्या असून १०० रुपये हे ००१ असे प्रिंट झाले आहे. भंडाऱ्यात पहिल्यांदाच शंभराची नोट या प्रकारे एटीएम मधून प्राप्त झाल्याने चर्चेला पेव फुटले आहे.
ही घटना सायंकाळी ६ नंतर घडल्याने बँकही बंद झाली होती. परिणामी त्यांना याबाबतची माहिती बँक प्रशासनाला कळविता आली नाही. रक्कम मिळाल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर दोन हजार रुपये अकाऊंटमधून कपातीचा संदेशही प्राप्त झाला असून याची माहिती बँकेला कळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)