गणेशोत्सव मंडळांची सुरक्षा मंडळांवरच!
By admin | Published: September 26, 2015 12:27 AM2015-09-26T00:27:25+5:302015-09-26T00:27:25+5:30
शहरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे.
भंडारा : शहरात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. गणेश मंडपासमोर दिवसभर मंडळाच्या कार्यकर्त्यांची चहल-पहल राहत असली तरी, रात्रीच्या वेळी बहुतांश गणेश मंडपाची सुरक्षा मंडळाच्या कार्यकर्त्यांवरच असल्याचे चित्र बुधवारला रात्री ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीदरम्यान आढळून आले.
यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेशोत्सवापूर्वीच गणेश मंडळांची नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले होते. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्यावतीने सुरक्षा व्यवस्था राखण्याचे नियोजन करण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सजगता पाहण्यासाठी ‘लोकमत’ चमूने रात्री उशिरा गणेश मंडळांना भेटी देऊन पाहणी केली.
रात्री १ वाजतादरम्यान ‘लोकमत’ चमू गांधी चौक परिसरात पोहोचली. चौकानजिकच्या ‘भंडाराचा राजा’ गणेश मंडळातील काही कार्यकर्ते मंडपात उपस्थित होते; परंतु, तेथून जवळच असलेल्या एका गणेश मंडपात एकही कार्यकर्ता दिसून आला नाही. त्यानंतर मोठा बाजार परिसरातील गणेश मंडपातही कुणी आढळून आले नाही. त्यानंतर लोकमत चमू खात रोडकडे जाताना काही लहान-मोठे गणेश मंडळे होती. या मंडळामध्ये कार्यकर्त्यांनी रात्रभर लायटिंग सुरू ठेवल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद चौकातून मुख्य चौकात विद्युत खांबावर रोषणाई दिसून आली. परंतु, येथे देखील मंडळातील कार्यकर्त्यांची अनुपस्थिती दिसून आली. रात्रभर विजेचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. हीच स्थिती शहरातील इतरही गणेश मंडळांमध्ये दिसून आली. कार्यकर्त्यांची सजगता तपासत असताना पोलीस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही नजर ठेवली होती. रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागात चमूने पाहणी केली. दरम्यान, मुख्य चौकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती आढळून आली नाही. शहरातील मुख्य मार्गावर पोलिसांची गस्त नसल्याचे आढळून आले. एकंदरित गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरक्षेसंदर्भात उदासीनता आढळून आली.
कायदा व सुव्यवस्थेसाठी करण्यात आलेले नियोजन किती प्रभावीपणे पाळण्यात येत आहे, याचे स्पष्ट चित्र लोकमतने केलेल्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले. गणपती बाप्पाच्या सुरक्षेखातर सार्वजनिक गणेश मंडळांनी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहते, याची पाहणी करण्यासाठी मध्यरात्री ‘लोकमत’ चमूने केलेल्या पाहणीत शास्त्री चौक, खांबतलाव र्चौक, राजीव गांधी चौक परिसरात गस्तीवर असणारे पोलिसांचे एकही वाहन दिसून आले नाही. गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे.
(लोकमत चमू)