चोरट्यांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:44 PM2019-02-06T21:44:02+5:302019-02-06T21:44:45+5:30
शहरासह ग्रामीण भागात चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चौघा सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांनी १२ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरासह ग्रामीण भागात चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चौघा सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांनी १२ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
रजनीकांत केशव चानोरे (१८) रा.भंडारा, अमीत जगदीश नंदागवळी (३२) रा.नागपूर, विक्की उर्फ गोविंद व्यास साहानी (२७) रा.भंडारा, आकाश भोजलाल राहांगडाले (२२) रा.सुभाष वॉर्ड वरठी अशी अटकेतील घरफोडी करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी भंडारा, मोहाडी, तुमसर परिसरात १२ ठिकाणी घरफोडी करून सोन्याचांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल लंपास केल्याचे उघडकीस आले.
गत काही दिवसांपासून भंडारा शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटनात वाढ झाली होती. भर दिवसा चोरीच्या घटना घडत होत्या. घरासमोरील दुचाकी हातोहात लंपास होत होत्या. घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरीस जात होते. घराला कुलूप लावताना घरमालक दहादा विचार करीत होता. या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या निर्देशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी आपल्याकडे तपास घेतला. चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत यावरून तपास सुरु झाला. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या सराईत टोळ्यांची माहिती मिळविली. त्यावरून या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पोटे, बबन पुसाटे, पोलीस निरीक्षक सचिन गदादे, पोलीस शिपाई मोहरकर, सुधीर मडमे, मंगल कुथे, बोरकर, विजय तायडे, निरंजन कडव, राधेश्याम ठवकर, शैलेश बेदूरकर, ईश्वरदत्ता मडावी, पंकज भित्रे, कौशीक गजभिये यांनी केली.
या चोरट्यांनी विविध ठिकाणी घरफोडी केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातून सध्या हे चौघे शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत. भंडारा शहरात झालेल्या विविध चोरीच्या घटनात या चौघांचा सहभाग होता काय याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर चव्हाण करीत आहेत. चोरट्यांची आणखी टोळी सक्रीय आहे काय? याचाही शोध घेतला जात आहे.
बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. घराला कुलूप दिसले की चोरी झाली म्हणूनच समजा. या चोरीच्या घटनांनी ग्रामीण भागात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर भर दिवसा चोरीच्या घटना घडल्या आहेत. आता चोरट्यांची टोळी सापडल्याने काही चोरींचा उलगडा होईल. मात्र नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. कुणी संशयीत इसम फिरताना आढळून आल्या सत्याची माहिती त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी.
-विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.