आधी लिफ्ट मागायचे, मग चालकाला बेशुद्ध करून वाहन पळवायचे; टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:04 PM2021-11-17T16:04:27+5:302021-11-17T16:08:08+5:30

एखाद्या चालकाला लिफ्ट मागून वाहनात बसायचं. रस्त्याने जाताना गोड बालून त्यांना चहा-बिस्कीट द्यायचा, त्यामध्ये झोपेची गोळी टाकायची. चालक बेशुद्ध झाला की चोरटे आपल्या साथीदारांना बोलावून चालकाला तेथे सोडून कार घेऊन पळवून जायचे.

The gang who hijacked the car by making the driver unconscious was arrested | आधी लिफ्ट मागायचे, मग चालकाला बेशुद्ध करून वाहन पळवायचे; टोळी गजाआड

आधी लिफ्ट मागायचे, मग चालकाला बेशुद्ध करून वाहन पळवायचे; टोळी गजाआड

Next
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई आंतरराज्यीय टोळीचा छडा, तुमसरसह अनेक ठिकाणी चोरी

भंडारा : आधी कार चालकांना लिफ्ट मागायची, मग रस्त्यात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करायचे आणि कार घेऊन पळायचे. अशा पद्धतीने वाहन पळविणारी आंतरराज्यीय टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे.

छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे कार विकताना तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. गत आठवड्यात तुमसर तालुक्यातील आंधळगाव येथील एका तरुणाला असेच बेशुद्ध करून त्याची कार पळवून नेली होती. ही टोळी जेरबंद झाल्याने अनेक चोरीचा छडा लागणार आहे.

पुष्पेंद्रसिंह ऊर्फ गब्बर मितंजयसिंह चालुक्य (वय ४२) रा. खैरागड राजनांदगाव, सतबीरसिंग निंदरसिंग शेरगील (३६) रा. भिलाई जि. दुर्ग आणि भाष्कर ऋषिकेश नंदेश्वर (५२), रा. सिव्हिल लाईन साकोली ह.मु. टाकळघाट जि. नागपूर अशी चोरट्यांची नावे आहेत.

९ नोव्हेंबर रोजी आंधळगाव येथील कैलास लक्ष्मण तांडेकर याने एका अनोळखी इसमाला तुमसर येथून आपल्या कारमध्ये लिफ्ट दिली होती. मात्र, काही वेळानंतर त्याला बेशुद्ध करून त्याची कार पळवून नेली होती. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तुमसर पोलिसांनी तपास सुरू केला होता तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. वरिष्ठांच्या परवानगीने एक पथक खैरागड व दुसरे दुर्ग येथे रवाना झाले. स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने गोपनीय माहिती काढली. त्यावेळी कार विक्रीसाठी दोघेजण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी दुर्ग येथील सिव्हिल लाईन परिसरात सापळा रचला तेव्हा सिल्व्हर रंगाची मारुती अर्टिगा कार येताना दिसली. त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यात तुमसर येथून चोरून नेलेल्या कारची नंबर प्लेट दिसून आली. पोलिसांना तुमसर येथील हीच कार असल्याची खात्री पटली. त्यावरून पुष्पेंद्र आणि सदबीरसिंग यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत भाष्कर नंदेश्वर याने मदत केल्याचे सांगितले. त्यावरून या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून मारुती कार, पाच मोबाईल आणि झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, नितीन राजकुमार, भूषण पवार, विवेक राऊत, नितीन महाजन, नंदकिशोर मारबते, स्नेहल गजभिये, अमोल खराबे, मंगेश माळोदे यांनी केली.

१२७ झोपेच्या गोळ्या जप्त

बेशुद्ध करून कार पळविणाऱ्या टोळीजवळून पोलिसांनी १२७ झोपेच्या गोळ्या आणि क्रीम बिस्कीट हस्तगत केले आहे. ही मंडळी सावज हेरून चालकाला मोठ्या शिताफीने चहा-बिस्कीट द्यायचे आणि त्यात झोपेच्या गोळ्या टाकायचे. चालक बेशुद्ध झाला की कार घेऊन पसार व्हायचे.

अशी करायची आंतरराज्यीय टोळी चोरी

या टोळीचा सदस्य भाष्कर हा चोरी करण्यासाठी जागा निवडायचा. सावज टप्प्यात आले की, त्याची माहिती आपल्या साथीदारांना द्यायचा. भाष्कर हा शरीराने अधिक वजनी असून त्याला व्यवस्थित चालता येत नाही. तो त्याच्या शरीरयष्टीचा फायदा चोरीसाठी करीत होता. एखाद्या चालकाला लिफ्ट मागून वाहनात बसायचा. रस्त्याने जाताना गोड बालून त्यांना चहा-बिस्कीट द्यायचा. त्यामध्ये झोपेची गोळी टाकायचा. चालक बेशुद्ध झाला की भाष्कर पुष्पेंद्र आणि सदबीर यांना बोलावून चालकाला तेथे सोडून कार घेऊन पळवून जायचे.

चंद्रपूर व गोंदियातही चोरी

आंतरराज्यीय कार चोरट्याच्या टोळीने चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर, मध्य प्रदेश राज्यातील नैनपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून प्रत्येकी एक महिंद्रा पिकअप चोरून नेली होती. चोरी गेलेल्या कारची विल्हेवाट लावण्यासाठी छत्तीसगढ राज्यातील दुर्गमध्ये घेऊन जात होते. आता या चोरीचा पर्दाफाश झाल्याने चोरट्यांची टोळी हाती लागण्याची शक्यता आहे.

Web Title: The gang who hijacked the car by making the driver unconscious was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.