१५० वर्षांची परंपरा असलेली आष्टीची गरदेव यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:35 AM2021-03-21T04:35:14+5:302021-03-21T04:35:14+5:30
तुमसर : दर तीन वर्षांनी भरणाऱ्या १५० वर्षाची परंपरा असलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी येथील गरदेव यात्रेवर यंदा कोरोना संसर्गाचे ...
तुमसर : दर तीन वर्षांनी भरणाऱ्या १५० वर्षाची परंपरा असलेल्या तुमसर तालुक्यातील आष्टी येथील गरदेव यात्रेवर यंदा कोरोना संसर्गाचे सावट दिसत आहे. धूलिवंदनाच्या दिवशी भरणारी ही यात्रा पूर्वी दीड महिना भरली जायची. मात्र आता एक ते दोन दिवसाची यात्रा भरते. विदर्भासह मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने येथे भाविक येथे येतात. शुक्रवारी जंगलातून गरदेव आणले तेव्हा भाविकांची उपस्थिती होती.
बावनथडी नदीकाठावरील शेतातून दोन झाडांची गरदेवसाठी निवड केली जाते. ही दोन्ही झाडे वेगवेगळ्या रंगांची असणे आवश्यक असते. या झाडापासून गरदेव तयार करतात. दोन्ही झाडे २५ ते ३० फूट लांब असतात. नदीच्या प्रवाहातून वाहतूक करून बैलबंडीने गरदेव आणले जाते. त्यानंतर धार्मिक प्रथा परंपरेनुसार त्या दोन्ही गरदेवांचे पूजन करण्यात येते. त्यावेळी ‘हर हर महादेव’चा जयजयकार करण्यात येतो. गरदेवचे पूजन, अभिषेक व रंगरोटी करण्यात येते. होळीच्या दोन दिवसांपूर्वी जुन्या गरदेव स्तंभाऐवजी नवीन झाडावर गरदेवाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. यावेळी महिला, पुरुष, तरुण, लहान बालके गरदेवांचे मनोभावे स्वागत करतात.
झाडांच्या सर्वात वर असलेल्या ठिकाणी पुजारी वांग्याचे चार तुकडे करून चारही दिशेला भिरकावतात ज्याला वांगे मिळेल त्याला नशीबवान समजले जाते. गरदेव यात्रेला वांगा हरी तथा मेघनाथ यात्रा म्हटले जाते. साठ वर्षांपूर्वी येथे दीड महिना यात्रा भरत होती. यात्रेत जीवनोपयोगी वस्तूसह मनोरंजनाच्या साधनांचा समावेश होता. आता एक ते दोन दिवसांची यात्रा भरते. यंदा तर कोरोनाचे सावट असल्याने या यात्रेच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
गरदेव यात्रेचा इतिहास
१५० वर्षांपूर्वी बावनथडी नदीला पूर आला होता. त्यावेळी दोन लाकडे नदीच्या प्रवाहात वाहत आली. आष्टी येथील ग्रामस्थांनी लाकडांना जाळून घरी त्याच्यावर भोजन तयार केले. तेव्हा भोजन तयार करणारी भांडी तुटून पडली. दुसऱ्या वर्षी आष्टी येथे दुष्काळ पडला. येथील पुजाऱ्याला स्वप्न पडले. मेघनाथ राजाने सांगितले की, नदी प्रवाहात वाहून येणारे लाकडे साक्षात शिवपार्वती होते. तुम्ही आता जंगलात जाऊन दोन लाकडे घेऊन या त्यांचे रंग वेगळे असायला पाहिजे. ज्यांची सावली एकमेकावर पडते अशाच वृक्षांची निवड करावी. ग्रामस्थांनी तेव्हापासून दोन लाकडांना शिवपार्वती समजून घेऊन येतात. तेव्हापासून येथे यात्रेला सुरुवात झाली.