भंडारा जिल्ह्यात गॅस कटरने फोडले एटीएम; सव्वा लाखांच्या नोटा जळाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 09:36 AM2017-12-20T09:36:53+5:302017-12-20T09:38:03+5:30
तुमसरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम पाच शस्त्रधारी तरुणांनी गॅस कटरने कापले. दरम्यान स्फोट होऊन एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. आवाजानंतर दरोडेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले.
मोहन भोयर ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा: तुमसरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम पाच शस्त्रधारी तरुणांनी गॅस कटरने कापले. दरम्यान स्फोट होऊन एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. आवाजानंतर दरोडेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. परंतु दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. हा थरारक प्रकार सोमवारी रात्री ११.३० च्या दरम्यान घडला. दरम्यान यात १ लाख १२ हजार रूपयांच्या नोटा अर्धवट जळाल्या.
तुमसर शहरात देव्हाडी मार्गावर भारतीय स्टेट बँक असून मुख्य गेटजवळ बँकेचे एटीएम आहे. रात्री ११.३० च्या सुमारास पांढऱ्या रंगाची (डीएल ३ सी - एएस ४९१३) चारचाकीतून पाच बुरखाधारी तरुण खाली उतरले. एटीएमला लागून असलेल्या यासीन ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारा जसीन इसराईल (१७) तिथे उभा होता. बुरखाधारी एका तरुणाने देव्हाडीकडे जाणारा रस्ता त्याला विचारला. त्याच वेळी काही जण एटीएममध्ये होते. दरम्यान, एका दरोडेखोराने जसीनजवळील मोबाईल हिसकावून त्याला चारचाकीत कोंबले. त्यावेळी या दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला असता तिथे आग लागली. या आगीत एटीएममधील १ लाख १२ हजार रुपयांच्या नोटा अर्धवट जळाल्या. या स्फोटात एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. मोठ्या आवाजामुळे दरोडेखोरांनी पळ काढला. जसीनने चारचाकीतून उडी मारून धूम ठोकली. धावत्या गाडीत इतर दरोडेखोर बसून देव्हाडी मार्गाने ते पसार झाले. तुमसर पोलिसांना ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना सोबत घेऊन दरोडेखोरांचा पाठलाग केला.
मौदाजवळील माथनी टोल नाक्याजवळ दरोडेखोर दिसले. यावेळी दरोडेखोर व पोलिसात चकमक झाली. पोलिसांनी दोन ते तीन राऊंड फायर केले, परंतु दरोडेखोर तेथून पसार झाले. या दरोडेखोरांचा कसून शोध सुरू आहे. जसीन इसराईल याच्या तक्रारीवर तुमसर पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व दुपारी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी एटीएमची पाहणी करून पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर उपस्थित होते.
एटीएम सुरक्षेकरिता चौकीदार राहत नाही. एटीएममध्ये नेमक्या किती नोटा होत्या, हे आताच सांगता येत नाही. सध्या तपास सुरू आहे.
- संदीपन रॉय, शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक, तुमसर