गॅस सिलिंडर वाढविले २२५ रुपये अन् कमी केले १० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:31 AM2021-04-03T04:31:50+5:302021-04-03T04:31:50+5:30
इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संकटकाळात महागाईचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. खाद्यतेलापासून ते किराणा साहित्य ...
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संकटकाळात महागाईचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. खाद्यतेलापासून ते किराणा साहित्य तर आता गॅसच्या वाढत्या किमतींनीही सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वर्षभरात दोनशे पंचवीस रुपयांनी सिलिंडर महागला असून, आता फक्त दहा रुपयांनी कपात करून गोरगरिबांचे कोणते इप्सित साध्य करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
जिल्ह्यात हजारो घरगुती गॅसधारक आहेत. महिन्याकाठी सिलिंडरची उचल केली जाते. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मार्च महिन्यात ८८० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर मिळाला. अवघे ४० ते ४५ रुपयांची सबसिडी त्यावर मिळत आहे. यावर गांभीर्याने उपाययोजना करावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.
सबसिडी मिळते नावापुरतीच
एक ते दीड वर्षात वीज, गॅस सबसिडीवर दोनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत सबसिडी मिळायची. मात्र, आता ८७१ रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरवर फक्त ३५ ते ४५ रुपयांपर्यंत सबसिडी मिळत आहे. ही सबसिडी म्हणजे नावापुरतीच असल्याचे गॅस ग्राहकांचे म्हणणे आहे. ही सबसिडीही कशाला देता, असा उपरोधिक सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत. कोरोना संकटकाळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होण्याऐवजी ते सातत्याने वाढत असल्याने गरिबांची फार पंचाईत झाली आहे. पाच महिन्यातील गॅस सिलिंडरच्या किमतीवर नजर घातल्यास नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ६६३ रुपयांत मिळत होता. त्यानंतर याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली आहे. जवळपास दोनशे पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे.
कोरोना संकटकाळात गॅस सिलिंडरच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात आता १० रुपये कमी करून काय उपयोग. भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरू आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आर्थिक बजेट बिघडले आहे.
- सुषमा निमजे, गृहिणी, भंडारा
घरगुती गॅस सिलिंडरमागे २२५ रुपयांची वाढ ही गरिबांसाठी मारक ठरणारी आहे. हातावर कमाविणे व पानावर खाणाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे. यावर उपाययोजना करून गॅस दरवाढीबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सबसिडीही नावालाच मिळत आहे.
- ममता बारापात्रे, गृहिणी, भंडारा
पाहता पाहता गॅसचे दर चांगलेच वधारले आहेत. आधी महिन्याकाठी ४६० रुपयांना मिळणारा सिलिंडर ६६० व आता ८७१ रुपये या दराने मिळत आहे. दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गोरगरिबांना उज्ज्वला योजनेचा लाभ तर मिळालेला आहे, पण एवढे दर द्यायचे कुठून, असा प्रश्न आहे.
- सुनंदा धाबेकर, गृहिणी