पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा सामान्यांना फटका
By admin | Published: May 25, 2015 12:36 AM2015-05-25T00:36:57+5:302015-05-25T00:36:57+5:30
युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.
आश्वासन निघाले फोल : वर्षभर कमी झाल्यानंतर पुन्हा वाढताहेत दर
भंडारा : युपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. परंतु केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यास सुरुवात झाली. परंतु, सन २०१५ चा शुभारंभ होताच पेट्रोल-डिझेल पुन्हा जुन्याच दरावर येताना दिसत आहेत.
१ एप्रिल २०१४ च्या तुलनेत दर आताही कमीच आहेत. मात्र, महागाईची स्थिती अशीच कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेलचे दर मागील दरापेक्षा अधिक होण्यास वेळ लागणार नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने कमी होत असल्यामुळे त्यांना त्याची सवय पडली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय तेल कंपन्यांसमोर दर वाढविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी सत्तारूढ झालेल्या शासनाने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे स्वप्न दाखविले. सलग पाचवेळा भाव कमी केल्याचा गाजावाजा केला. परंतु दरवाढीचा निर्णय केंद्र घेत नाही, हीच शोकांतिका ठरली. (प्रतिनिधी)
आकड्यांची कमाल
मे २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे दर १३२ डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी भंडाऱ्यात पेट्रोलचे दर ८३.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ६७.0६ रुपये प्रति लिटर होते. मे २०१५ मध्ये आंतर राष्ट्रीय बाजारात क्रूड आॅईलचे दर ८० डॉलर प्रति बॅरल आहेत. परंतु जनतेला जेवढा दिलासा मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाही. आताही भंडाऱ्यात पेट्रोलचे दर ७६.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ६३.०४ रुपये प्रति लिटर आहेत.