दुर्गाबाईच्या डोहात पवित्र स्रानासाठी भाविकांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:22+5:30
यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच दिवस चालते. या यात्रेत पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्याची दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते.
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभली येथील दुर्गाबाई डोहच्या यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या डोहात श्रध्देने स्नान करण्यासाठी हजारो भाविक येतात. मंगळवारी पहाटेपासून या पवित्र स्नानाला प्रारंभ होणार आहे. दुर्गाबाई देवी व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे भक्तीभावाने येतात.
विदर्भात प्रसिध्द असलेला या यात्रेत जिल्ह्यासह नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे. मकरसंक्रातीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा चार ते पाच दिवस चालते. या यात्रेत पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्याची दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते.
पूर्वीपासून घोड्यांच्या विक्रीसाठी ही यात्रा प्रसिध्द आहे. परंतु कालांतराने घोडाबाजार मंदावला. दोन ते चार घोड्यांचे दर्शन मात्र होत होते. या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रुपयाची उलाढाल होते. हॉटेल्स, कपड्याची दुकाने, स्वेटर, जॅकेट, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, दगडी पाट्यांची दुकाने, प्रदर्शनी तसेच मुलांना विशेष आकर्षण असलेले ब्रेक डान्स झुला, मौत का कुवा या सार्व प्रकारामुळे यात्रा फुसून जाते. यात्रेकरिता प्रवाशांची जाण्यायेण्याची पध्दतशीर सोय व्हावी म्हणून एस. टी. महामंडळातर्फे ज्यादा बसेसची व्यवस्था केलेली असते.
यात्रेत निसर्गाचा सुंदर नजराणा पहावयास मिळत असतो. यात्रेचे भव्य स्वरुप बघता पोलीस प्रशासन बारिक नजर ठेऊन आहे. यात्रेत खरेदी-विक्रीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असून प्लॉस्टिकचा वापर जास्त प्रमाणात होतो. यात्रेत प्लास्टिकचा वापर होऊ नये व यात्रा प्लास्टिकमुक्त व पर्यावरण पुरक याकरिता बॅनरद्वारे व स्वयंसेवकाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. अशाप्रकारे दुर्गाबाईचे मंदिर हे जागृत देवस्थान असून भाविक मोठ्या भक्तीभावाने येऊन मकरसंक्रातीच्या पर्वावर भरणाºया यात्रेत दुर्गादेवीचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेतात. चार ते पाच दिवस चालणाºया यात्रेनिमित्त गावात भजन, पूजन, नाटक, कव्वाली असे अनेक मनोरंजनात्मक व जनजागृतीचे कार्यक्रम होत असतात. सदर यात्रा भरण्याचा पूर्वइतिहास असून दुर्गाबाई व त्यांच्या सात भावांनी बांधलेल्या परंतु अर्धवट राहिलेल्या खिंडीचे दर्शन सुध्दा होते. सामाजिक ऐक्य, समरसता व निसर्गाची मुक्त उधळण या यात्रेत पहावयास मिळत असते, हे येथे उल्लेखनीय.
डोहाच्या पाणी पातळीत वाढ
या डोहावर निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला असून प्रकल्पाची सर्व दारे बंद करुन पाणी अडविले असल्यामुळे डोहातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे डोहाच्या चारही बाजूला बॅरिकेट्स तयार केले असून डोहाच्या बाजूने आंघोळीकरिता बंदी घालण्यात आली आहे.