गोशाळेच्या जनावरांची परस्पर विल्हेवाट, संस्थाध्यक्षाला अटक, चार पशुवैद्यकासह १३ संचालकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 10:37 AM2022-10-27T10:37:30+5:302022-10-27T10:46:54+5:30
पवनी तालुक्यातील प्रकरण
पवनी (भंडारा) : गोशाळेत दाखल जनावरांची पशुवैद्यकांच्या मदतीने परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी तालुक्यातील सिरसाळा येथील बळीराम गौमाता सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षाला बुधवारी पवनी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात चार पशुवैद्यक आणि १३ संचालकांवर पवनी ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अध्यक्षाला अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विसर्जन सज्जन चौसरे (४८) वर्षे रा. गौतमनगर वाॅर्ड, पवनी असे अटकेतील अध्यक्षांचे नाव असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. जनावरांची अवैध वाहतूकप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलिसांनी जप्त केलेली १५२ जनावरे पवनी तालुक्यातील बळीराम गोमाता सेवाभावी संस्थेत ठेवण्यात आली होती. मात्र, त्यापैकी ८९ जनावरे मृत झाल्याचे भासवून त्यांची विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या निर्देशावरून पवनीचे ठाणेदार दिलीप गढरी आणि सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी केली. त्यावेळी पशुवैद्यकांच्या मदतीने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.
पवनी ठाण्यात विसर्जन सज्जन चौसरे, विपीन शरद तलमले, मिलिंद रामदास बोरकर सर्व रा. पवनी, खुशाल दिलीप मुंडले रा. बेटाळा, विलास वेदूनाथ तिघरे रा. सिरसाळा, दत्तू शंकर मुनरत्तीवार, लता दौलत मसराम दोन्ही रा. पवनी, वर्षा लालचंद वैद्य रा. सिरसाळा, माया विसर्जन चौसरे रा. पवनी, महेश दौलत मसराम, युवराज रवींद्र करकाडे दोन्ही रा. पवनी, नाना मोतीराम पाटील रा. सिरसाळा, शिवशंकर भास्कर मेश्राम रा. पवनी तर पशुवैद्यक डॉ. दिनेश चव्हाण रा. पवनी, डॉ. सुधाकर महादेव खुणे रा. कन्हळगाव, ता. अर्जुनी मोरगाव, डॉ. हेमंतकुमार गभने रा. अड्याळ, डॉ. तुळशीदास शहारे रा. खात रोड भंडारा यांच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
तीन दिवसाची पोलीस कोठडी
पवनी पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी बळीराम गौमाता सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष विसर्जन चौसरे याला अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पोलीस गुन्हा दाखल झालेल्या इतर १६ जणांचा शोध घेत असून लवकर त्यांना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले.