रंगाची उधळण न करणारे गवराळा गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:19 PM2018-02-28T22:19:55+5:302018-02-28T22:19:55+5:30
होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात.
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर / विरली : होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते. यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण टिकवून आहे.
हिंदू धर्मात होळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळी, साखरेची गाठी आणि धुळवडीच्या दिवशी रंगांची उधळण सर्वजण करतात. परंतु, गवराळा हे गाव या यासाठी अपवाद ठरले आहे. येथे कर्मयोगी अनासक्त ब्रह्मलीन किसनबाबा अवसरे यांचा २५ वा पुण्यतिथी महोत्सव २५ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत आयोजित केला आहे.
सन १९९२ मध्ये होळीच्या दिवशी गावातील धार्मिकस्थळाच्या बांधकामासाठी जागा दान मागून सायंकाळी मंदिरात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, ज्या दिवसापासून अवसरे बाबा गावात आले तेव्हापासून गावात शांतता आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तेव्हापासून गावकºयांनी एकत्र येऊन होळी व धुळवडीचा सण परंपरेप्रमाणे साजरा न करता बाबांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानंतरच्या पिढ्यांनी हीच प्रथा सुरू ठेवली. गावात होळी पेटविली जाते. परंतु, ती लाकडांची नव्हे तर ग्रामसफाई करून जमा झालेल्या केरकचºयाची होळी असते. धुळवडीच्या दिवशी ग्रामगीता तत्त्वज्ञान, ग्रामसभा, ग्रामस्वराज्य या विषयांवर अनुभवी लोकांचे गावाचा विकास साधण्यासाठी मार्गदर्शन मिळते. हा कार्यक्रम ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या उपस्थितीत व संतांच्या सहवासात दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान व ग्रामकुटुंब योजना राबवून ग्रामस्वराज्य संकल्पना ठरवली जाते. तीन दिवसीय कार्यक्रमात ग्रामगीता प्रवचन, कीर्तन, भजन, पालखी, प्रदक्षिणा, अवसरे महाराजांना मौन श्रद्धांजली यासह रक्तदान, नेत्रतपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.
आदर्श परंपरा
राज्यात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरा करून लाकूड जाळले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. रंगातही लाखो रूपये खर्च होतात. निष्पाप प्राण्यांचे बळी घेतले जातात. यामुळे पर्यावरणाची हानी होते. हा प्रकार गवराळा या गावात होत नाही. त्यामुळे हे गाव सर्वांसाठी आदर्श ठरू पाहत आहे. गावात सारे हसतखेळत राहतात.