रेल्वेच्या ऐतिहासिक तलावाकडे महाप्रबंधकांनी फिरविली पाठ
By admin | Published: March 20, 2016 12:36 AM2016-03-20T00:36:53+5:302016-03-20T00:36:53+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचा दौरा समस्या व स्वच्छता पाहणी व निराकरण दौरा होता,...
समस्यांकडे दुर्लक्ष : स्वच्छता व निरीक्षणासाठी केला दौरा
तुमसर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचा दौरा समस्या व स्वच्छता पाहणी व निराकरण दौरा होता, परंतु हा दौरा एक फार्स ठरला. या दौऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेल्वे स्थानक परिसरापासून हाकेच्या अंतरावर असलेला ऐतिहासिक रेल्वे तलाव घाणींच्या साम्राज्याचे केंद्र बनला आहे. या तलावाबाबत जी.एम. व डी.आर.एम. यांनी एक चकार शब्दही काढला नाही. राजेशाही थाटात आगमन व त्याच दिमाखात परत जाणे हाच अनुभव स्थानिकांनी व रेल्वे प्रवाशांनी घेतला.
बिलासपूर-नागपूर रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक सुधेन्द्रकुमार व नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांचा तुमसर रोड, तुमसर, गोबरवाही, डोंगरी व तिरोडी येथे संयुक्त पाहणी दौरा बुधवारी झाला. रेल्वेस्थानक, रेल्वे सदनिका, रेल्वे स्थानकावरील प्रमुख कार्यालये, रेल्वे ट्रँक, सिग्नल प्रणाली, स्वच्छता व रेल्वे परिसरातील समस्या याबाबत हा पाहणी व निरीक्षण दौरा होता. एका विशेष रेल्वे गाडीने (वातानुकूलीत) त्यांचे आगमन प्रथम तुमसर रोड येथे झाले होते. प्रथम स्थानकांची पाहणी केली. बोबरवाही रेल्वे स्थानकाला त्यांनी प्रथम क्रमांक दिल्याची माहिती सुत्राने दिली.
तुमसर रोड रेल्वे स्थानकावर त्यांचे पुन्हा दुपारी एक वाजता आगमन झाले. संपूर्ण रेल्वे स्थानकाचा, कार्यालये व परिसराची पाहणी केली. या रेल्वे स्थानकावरील विविध समस्येकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या सोबत प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते, परंतु त्यांनी केवळ नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनाच केवळ प्रश्ने विचारली. त्यांच्याशीच चर्चा केली.
तुमसर रोड गावातील होणाऱ्या अपूर्ण फुटवे ब्रीजचा फटक्याबाबत राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा एवढेच उत्तर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. रेल्वे स्थानक परिसरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक रेल्वे तलावात पानवेलींचे जाळे तयार झाले आहे. तलावात पाणी दिसत नाही केवळ पाने व कचऱ्याचे ढीग तयार झाले. याकडेही दोन्ही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तलाव सौादर्यीकरणाचे प्रश्नावर त्यांनी मौण बाळगले.
वातानुकूलित एका विशेष गाडीत राजेशाही अंदाजात त्यांचे आगमन, अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या मागे ताफा याचेच दर्शन रेल्वे स्थानकावर प्रत्येकाला दिसून आले. हा निरीक्षण दौरा एक फार्स ठरल्याची चर्चा रेल्वे प्रवाशी व ग्रामस्थांमध्ये दिसली. दोन्ही अधिकाऱ्यांच्या आगमनाची पूर्वतयारी सर्वच रेल्वे स्थानक नटून-थटून होते. एखादा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आगमनापूर्वी भव्य दिव्यपणा करिता करण्यात येणारा खर्च कोण मंजूर करतो हा एक संशोधनाचा विषय आहे. लोकप्रतिनिधींना जसा बडेजावपणा आवडतो तसाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा हवा असतो, असे दिसते. (तालुका प्रतिनिधी)