जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

By admin | Published: June 19, 2016 12:14 AM2016-06-19T00:14:47+5:302016-06-19T00:14:47+5:30

जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा शुक्रवारला रात्री ९ वाजेपर्यंत लांबली. बहुतांश सभासदांचे प्रश्न विषयसूचीवर आले नाही.

The general meeting of the ZP | जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

Next

दुसऱ्या दिवशीची उर्वरित सभा रद्द : सत्ताधारी-विरोधकांची सलगी, कृषी अधिकाऱ्याला माफी मागण्यासाठी भाग पाडले
भंडारा : जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा शुक्रवारला रात्री ९ वाजेपर्यंत लांबली. बहुतांश सभासदांचे प्रश्न विषयसूचीवर आले नाही. त्यामुळे ही सभा दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रात्रीतून कोणती डाळ शिजली कुणास ठाऊक शनिवारची सभा रद्द करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारला झालेल्या सभेत शिक्षकांचे बदली प्रकरण, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, पाणीपट्टी कराच्या विषयाने सभागृहात अक्षरक्ष: वादळ उठले.
जिल्हा परिषद सदस्यांना त्यांच्या क्षेत्रातील विकास तथा अनेक योजनांची माहिती पूर्ण करून घेण्यासंबंधी शुक्रवारला सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभाध्यक्षपदी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्यासह उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्यासह सर्व विभागाचे सभापती व विभागप्रमुख उपस्थित होते.
या सभेत लघु पाटबंधारे विभागातील अनियमितता, कृषी विभागाचा गलथान कारभार, शिक्षकांचे बदली प्रकरण, शिक्षण विभागातील नविन वर्गखोली बांधकाम मुद्दा, साकोली तालुक्यातील शुध्द पाणी पुरवठा यंत्राचा मुद्दा असे अनेक मुद्दे वादळी ठरले. ही सभा विविध मुद्यांनी वादळी ठरली. या सभेत पहिल्या मुद्यावर समाधानकारक तोडगा निघण्यापूर्वीच अनेकांनी मधातच दुसरा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रकार केला. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर निर्णय होऊ शकले नाही.
वर्गखोली व ‘आरो’चा मुद्दा गाजला
जिल्हा परिषद शाळांना डावी-कडवी योजनेतून नविन वर्गखोली बांधण्याचे प्रस्तावीत आहेत. याबाबत ई-निविदा प्रकाशित झालेली आहे. मात्र, सदर बांधकाम शाळा शिक्षण समितीला देण्यात यावे, असा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला. त्यामुळे निविदा मागविल्या असल्याने तसे करता येत नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी निंबाळकर यांनी सभागृहाला सांगितले. यावर अनेकांनी आक्षेप घेत निविदा रद्द करा, असा मुद्दा रेटला. साकोली तालुक्यात शुध्द पाण्यााचे यंत्र वाटपाची माहिती साकोलीचे सभापतींनी मागितली. यावर साकोलीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. अधिकारी पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांचे ऐकत नाही, असा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले यांनी सभागृहात गदारोळ केला.
आरोग्य अधिकाऱ्यांविरूद्ध रोष
पहेला येथील आरोग्य केंद्रातील बालकांना देण्यात येणाऱ्या लसीबाबत हयगय केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांचे गोपणीय बयान घेण्यात आले. हे बयान सार्वजनिक झाले तरीही आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे हे कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत अरविंद भालाधरे, चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी हा मुद्दा लावून धरला. या प्रकरणात चौकशी समितीला अहवाल सादर का केला नाही? असा प्रश्न केला असता तो अहवाल लवकरच सादर करू असे सांगितले. हा मुद्दा दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सभेत चर्चेला येणार होता. परंतु रात्री काय झाले कुणास ठाऊक शनिवारला सभा झालीच नाही. (शहर प्रतिनिधी)

लघु पाटबंधारे विभागाचा मुद्दा रेटला
लघु पाटबंधारे विभागातील अनियमिततेचे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरले आहे. हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, रामराव कारेमारे यांनी सभागृहात उपस्थित करून दोघांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले. कोट्यवधींचा निधी असतानाही कामे अपूर्णावस्थेत असून किती कामे पूर्ण झाली याची माहिती मागितली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रभारी कार्यकारी अधिकारी रामदास भगत यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान, तलावांच्या सर्वेक्षणाच्या कामाची दुसऱ्यांदा निविदा काढली. त्यातही निविदा उघडण्याच्या आदल्या दिवशी शुध्दीपत्रक काढून निविदात घोळ केल्याचा संतापजनक प्रकार आला.

Web Title: The general meeting of the ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.