जनरल तिकिटांची विक्री बंदच; रेल्वेत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:00 AM2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:45+5:30
रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतच आहे. परिणामी आरक्षित डब्यातील गर्दी वाढली असून आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना फुकट्या प्रवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असतानासुध्दा रेल्वे अद्यापही जनरलचे डबे जोडले नसून जनरल तिकीट विक्रीसुद्धा सुरू केली नाही.
देवानंद नंदेश्वर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा जोर कमी होताच रेल्वे विभागाने पंधरा दिवसांपूर्वी नियमित रेल्वे गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी एक्स्प्रेस गाड्यामध्ये तिकीट आरक्षित केल्याशिवाय प्रवास करता येत नाही. तर जनरल तिकिटांची विक्री बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतच आहे. परिणामी आरक्षित डब्यातील गर्दी वाढली असून आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना फुकट्या प्रवाशांचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असतानासुध्दा रेल्वे अद्यापही जनरलचे डबे जोडले नसून जनरल तिकीट विक्रीसुद्धा सुरू केली नाही. त्यामुळे जनरलचे डबे केव्हा जोडणार असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
- गोंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
- अजमेर -पुरी एक्स्प्रेस
- हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस
- समता एक्स्प्रेस
- हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस
- गोंदिया-झारसुकडा एक्सप्रेस
आरक्षित तिकीट असेल तरच प्रवास
- रेल्वे विभागाने पंधरा दिवसांपूर्वी नियमित गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा काढला. मात्र या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडले नाहीत. त्यामुळे ज्या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आहे त्याच प्रवाशांना प्रवास करता येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांचे हाल अद्यापही कायम असून त्यांना अतिरिक्त तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आरक्षित डब्यात वाढले फुकटे प्रवासी
- नियमित गाड्यांना अद्यापही जनरल डबे जोडलेले नाही. त्यामुळे अनेक फुकटे प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करीत आहे. त्यामुळे याचा त्रास तिकीट आरक्षित करून जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- रेल्वे विभागाने सुद्धा या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूृल केला आहे. यातून रेल्वेचे उत्पन्न वाढले असले तरी प्रवाशांचा त्रास मात्र वाढला आहे. ही समस्या दूर करावी.
प्रवासी म्हणतात..
कोरोनाच्या नावावर मागील दीड वर्ष नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देऊन एकप्रकारे प्रवाशांची लूट केली. आता विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी जनरल डबे न जोडल्याने अतिरिक्त तिकिटाचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
-हर्षल लाडे, प्रवासी
रेल्वेने अद्यापही एमएसटीची सुविधा सुरू केली नाही तर नियमित गाड्यांचे तिकीट दर अद्यापही कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वेने नियमित गाड्यांना जनरलचे डबे त्वरित जोडावे.
- श्रवण राऊत, प्रवासी