कुटुंबप्रमुखांचा नि:शुल्क विमा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:43 PM2018-04-06T23:43:48+5:302018-04-06T23:43:48+5:30
देव्हाडा (बुज.) ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या कल्याणार्थ वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी मोहाडी तालुक्यात ओळखली जाते. यापुर्वीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या निधीची वा मदतीची वाट न पाहता अनेक स्वतंत्र लोकहितार्थ योजना, प्रशिक्षण उपक्रम राबविले आहेत.
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : देव्हाडा (बुज.) ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या कल्याणार्थ वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी मोहाडी तालुक्यात ओळखली जाते. यापुर्वीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या निधीची वा मदतीची वाट न पाहता अनेक स्वतंत्र लोकहितार्थ योजना, प्रशिक्षण उपक्रम राबविले आहेत. यावर्षी गावातील सर्व कुटूंबप्रमुखांचा नि:शुल्क विमा उतरविण्याचा संकल्प सरपंच विणा पुराम व उपसरपंच महादेव फुसे तसेच पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून सदर योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाºया बजेटला ग्रामसभेने मंजुरी दिली आहे.
देव्हाडा (बुज.) गावाची लोकसंख्या २,५०० असून कुटूंब संख्या ६०० आहे. गावातील सर्व कुटूंब प्रमुखांचा विमा उतरविण्यामागचा हेतू सांगताना उपसरपंच महादेव फुसे म्हणाले, ३१ डिसेंबर २०१७ रोजी गावातील गुड्डू उके (२७) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. तो कुटूंबातील एकुलता कमावता असल्याने त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडीलांना कोणताही आधार नव्हता. शेतवाडी नसल्याने मोलमजुरी करणाºया त्या कुटूंबाची पुरती वाताहत झाली. त्यांचे संसार उघड्यावर आले. दारिद्रय रेषेखालील त्या कुटूंबाचा बँक खाता होता. पंरतू प्रधानमंत्री विमा योजनेचा वार्षिक प्रिमियम भरण्यासाठीही खात्यात पैसे नसल्याने लाभ मिळाला नाही.
गरीब व मोलमजुरी करणाºया गुड्डू उके यांच्यासारखे अनेक कुटूंब गावात आहेत. परंतु त्यांच्याकडे कोणतेही विमा संरक्षण नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना व अपघात झाल्यास अशांच्या वारसांना निदान आधार मिळावा, आर्थिक ताकद मिळावी या हेतूने ग्राम पंचायत सरपंच विणा पुराम, महादेव फुसे व सदस्य अरुण शेंडे, दुर्योधन बोंदरे व सर्व ग्रामपचांयत पदाधिकाºयांनी मासिक बैठकीत विचार मांडले. गावातील सर्व कुटूंबप्रमुखांचा विमा उतरविण्याला सर्वांनी संमती दिली. ग्रामसभेत संकल्पाला मूर्त रुप देण्याचा प्रस्ताव मांडला असता ग्रामस्थांना नि:शुल्क विमा उतरविण्याचा विचार पटला आणि ग्रामसभेने त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक बजेटला मंजूरी दिली.
अपघाती पॉलिसी व बजेट
अपघाती विमा योजनेत गावातील ६० वर्षाखालील ६०० कुटूंब प्रमुखांचा न्यू इंडिया इन्शुरंश कंपनीचा विमा उतरविला जाणार आहे. सदर विमा अपघाती स्वरुपाचा असून त्यानुसार पॉलीसीधारक कुटूंबातील नॉमिनेशन केलेल्या वारसांना एक लाखांची पॉलीसी रक्कम देय राहणार आहे. वार्षिक ६० रुपये विम्याची रक्कम ग्रामपंचायत सामान्य फंडातून दरवर्षी भरणार असल्याने यासाठी ग्रामपचांयतीला वार्षीक ३६ हजार रुपयांचा बजेट लागणार आहे.
तीन वर्षात राबविलेले उपक्रम व योजना
देव्हाडा ग्रामपंचायतीने तीन वर्षात उत्पन्नातून सुदंर माझ घर, स्वच्छ परिसर स्पर्धा राबविली. यासाठी ग्रामसभेत नियुक्त चमूच्या शिफारशीनुसार ५ हजार, ३ हजार व २ हजारांची बक्षीसे दिली जातात. वेळेवर उपचारासाठी नि:शुल्क रुग्णवाहिका, महिलांना स्वयंरोजगार करता यावा सासाठी शिवणकला प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थीनींना स्कुल बॅग व रजिस्टरचे वाटप, महिलांना सॅनीटरी पॅडचे नि:शुल्क वाटप, खाजगी व सार्वजनिक उपक्रम, नाममात्र शुल्कात टँकरने पाणीपुरवठा आदी उपक्रम राबवित आहेत.
देव्हाडा गावातील लोकही आमचेच आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कल्याणार्थ योजना व उपक्रम राबविणे आमचे कर्तव्य आहे. तीन वर्षापासून विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविले जात आहेत. लोकांना लाभ होत आहे. लोकांचे मिळालेले सहकार्य व पाठींबा आमच्यासाठी मोलाचा आहे.
-विणा पुराम/ महादेव फुसे, सरपंच, उपसरपंच देव्हाडा बुज.