विजयाचा भंडारा उधळण्यासाठी सज्ज व्हा ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 02:10 PM2024-11-08T14:10:23+5:302024-11-08T14:12:52+5:30
एकनाथ शिंदे : महायुतीची पवनीत जाहीर सभा; म्हणाले भोंडेकर हे विकासाचे दुसरे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी/भंडारा: नरेंद्र भोंडेकर यांना विकासाची प्रचंड तळमळ आहे. त्यांच्या डोक्यात नेहमी मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्नच असतात. विकासाचे दुसरे नाव नरेंद्र असलेल्या या आमदाराची हॅट्ट्रिक व्हायला हवी. त्यासाठी विजयाचा भंडारा उधळण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवनी येथील जाहीर सभेत केले.
संभाजी चुटे रंगमंदिराच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी प्रशांत भूते, राजेंद्र ब्राह्मणकर, नरेश बावनकर, किशोर पंचभाई, देवराज बावनकर, नामदेव सुरकर, राकाँचे तालुकाध्यक्ष विजय सावरबांधे, शैलेश मयुर, परमात्मा एक सेवक मंडळाचे कोटीराम मुंडले, विजय काटेखाये, महेंद्र निंबार्ते, नितीन कडव, राकाँ शहर अध्यक्ष हरिष तलमले, हरेश तलमले, माधुरी तलमले यांच्यासह अनेक पदाधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. जनसमूहाला आवाहन करताना ते म्हणाले, मी २३ तारखेच्या विजयाचे फटाके फोडण्यासाठी शुभेच्छा द्यायला आलो आहे. सभेला महिलांची प्रचंड गर्दी होती. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. लाडकी वहीण योजनेचा सन्मान निधी दिवाळीपूर्वी दिला. निवडणुका होताच डिसेंबरमध्ये अग्रिम हप्ता दिला जाईल. सरकारने राज्यात राबविलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. १० लाख युवकांना प्रशिक्षण देणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जे बोलतो ते करणारे आमचे सरकार आहे. धानाला यापूर्वी २० हजार रुपये बोनस होता.
तो २५ हजार रुपये देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. आम्ही अडीच वर्षात अनेक कामे केली, त्यांनी निव्वळ आमच्या विकासकामांमध्ये अडथळे घालण्याशिवाय दूसरे काय केले हे सांगावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
ते म्हणाले, भंडाऱ्याच्या जल पर्यटन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचा निधी दिला. या प्रकल्पाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून हजारो स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल. ते पुढे म्हणाले, मी कॉमनमॅन मुख्यमंत्री आहे. आमचे सरकार गरीब, शेतकरी, बहिणींसाठी हप्ते भरणारे आहे. ते सरकार हप्ते खाणारे आणि जेलमध्ये जाणारे आहे. या परिसरात मोठा उद्योग-व्यवसाय आणण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द त्यांनी दिला. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिला-पुरूष उपस्थित होते. लाडक्या बहिणींची गर्दी सभास्थळी लक्षणीय होती. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे कटआऊट्स सभास्थळी लावण्यात आले होते.
नरेंद्र भोंडेकर यांनी वेधले लक्ष
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या भाषणातून पवनी येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मात्र परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी हे रुग्णालय २०० करावे अशी मागणी त्यांनी केली. विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या पवनीतील ३७३ मंदिरांच्या विकासासाठी ३५० कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर करावा. गोसे खुर्द प्रकल्पातील बाधित ३४ गावांच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज द्यावे, अंशता बाधित असलेल्या ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंजुरी द्यावी, पवनी एमआयडीसीतील भूखंडाचे दर कमी करावे, बाबा जुमदेव यांच्या जयंतीनिमित्त ३ एप्रिलची सुट्टी लागू करावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे आग्रहपूर्वक मांडल्या, भोंडेकर यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल आपल्या भाषणात घेत मुख्यमंत्र्यांनी, सरकार स्थापन होताच मांडलेल्या सर्व मागण्या पूर्ण करू, बाबा जुमदेव यांच्यासाठी जाहीर केलेली सुट्टीही लागू केली जाईल, असे आश्वासन दिले.
ताणलेली उत्सुकता आणि आगमनानंतरचा उत्साह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नियोजित सभा ४:३० वाजता होती. मात्र त्यांची अमरावती जिल्ह्यातील सभा लांबल्याने पवनीमध्ये विलंबाने आगमन झाले. सायंकाळी हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नसल्याने नागपूरवरून रामटेकमार्गे ते कारने पोहोचले. तरीहीं तब्बल तीन तास महिला-पुरुषांची गर्दी त्यांच्या प्रतीक्षेत होती. यादरम्यान उपस्थितांची आणि आयोजकांची प्रचंड उत्सुकता ताणली होती. मात्र ठीक ७:०३ वाजता त्यांचे सभास्थळी आगमन झाले आणि सर्वांचेच चेहरे उत्साहाने फुलले.
मुख्यमंत्र्यांकडून भोंडेकरांवर कौतुकांचा वर्षाव
आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर वारंवार कौतुकेचा वर्षाव केला. विकासाचे दुसरे नाव नरेंद्र भोंडेकर आहे. त्यांच्या कामामुळेच आपण सारे उपस्थित झालो. मी स्वतः त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे सांगून त्यांनी आमदार कार्यक्षम असला तर काय चमत्कार होवू शकतो याचे नरेंद्र भोंडेकर हे उदाहरण आहे, असे म्हणाले, मुंबईत ते मला जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या डोक्यात फक्त मतदारसंघाच्या विकासाचेच प्रश्न असतात, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले