आठवडाभरात धानाचे चुकारे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:26+5:30
भंडारा जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर आतापर्यंत दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या खरेदीची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार एवढी आहे. धानाच्या चुकाऱ्याचे २८ कोटी प्राप्त झाले आहेत. ते शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे. २४ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी तात्काळ मिळवून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रखडलेले धान चुकारे येत्या आठ दिवसात करण्याचे निर्देश देत आरोग्य, शिक्षण, सिंचन पाणी, गोसेखुर्द पुनर्वसन व रोजगाराच्या रोजगार या विषयांचा आराखडा तयार करुन तात्काळ अमंलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे जिल्हा प्रशासनाला दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे आदी उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्रावर आतापर्यंत दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या खरेदीची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार एवढी आहे. धानाच्या चुकाऱ्याचे २८ कोटी प्राप्त झाले आहेत. ते शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे. २४ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी तात्काळ मिळवून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. धानाची भरडाई करण्यासाठी तात्काळ निविदा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात धान खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी आमदार राजू कारेमोरे व आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली असता केंद्र वाढविण्याची तात्काळ सूचना त्यांनी दिली.
आरोग्य, शिक्षण व सिंचन हे विषय प्राधान्याचे आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अद्यावत ठेवण्याची त्यांनी सांगितले. यावर्षी पाण्याची टंचाई जाणवणार नसली तरी पुढील २५ वर्षासाठी पिण्याचे पाणी व सिचंनाचे नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहात पक्षपात करणार नाही
विधानसभा अध्यक्षाचे पद संवैधानिक असून या पदाची प्रतिष्ठा कायम राखण्याचा आपण प्रयत्न करू सभागृहात आपण पक्षपात न करता जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.विधानसभा अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली असून भंडारा जिल्ह्याच्या लौकीकात कमीपणा येईल असे कोणतेही कृत्य आपण करणार नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून त्यामाध्यमातून मागासलेल्या विदर्भाचे प्रश्न सोडविले जातील, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत
विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांचे गुरुवारी जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले. त्यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. चिखली, जवाहरनगर, शहापूर, मुजबी, बेला, नागपूर नाका यासह भंडारा शहरातील विश्रामगृह आणि जिल्हाधिकारी कार्यालयातही नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. कारधा, लाखनी आणि साकोली येथे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.