करडीच्या विकासाला लागले रस्त्यावरील खड्ड्यांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:39 AM2018-08-31T00:39:11+5:302018-08-31T00:39:47+5:30
करडीच्या ग्रामच्या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक करणे असली तरी सबंधित विभागाची व अधिकाऱ्यांची विकासाप्रतीची उदासीनता प्रमुख ठरली आहे. विकासाच्या नावावर झालेल्या कामांना वर्ष, दीड वर्षातच खड्ड्यांची कीड लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : करडीच्या ग्रामच्या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यासाठी अनेक करणे असली तरी सबंधित विभागाची व अधिकाऱ्यांची विकासाप्रतीची उदासीनता प्रमुख ठरली आहे. विकासाच्या नावावर झालेल्या कामांना वर्ष, दीड वर्षातच खड्ड्यांची कीड लागली आहे. करडी पोलीस ठाणे समोरील गावातील मुख्य रस्त्याची ‘अवदसा’ पाहावली जात नाही. रस्त्याच्या दुरावस्थवेर संशोधन करण्याची वेळ करडीवासीयांवर आली आहे.
करडी ही परिसराची व्यापार नगरी म्हणून तालुक्यात ओळखली जाते. त्याचबरोबर आठवडी बाजाराचे प्रमुख केंद्र म्हणूनही नव्याने ओळख निर्माण करण्यात यश आले आहे. गावाच्या सौदर्यात भर पाडण्याचा भाग म्हणून काही चौकात सौंदर्यीकरणाचे काम व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्ता सिमेंटीकरणाने रुंद करण्यात आले.
गावातील घरकुल व शौचालयाचे प्रश्न दूर करण्यात बराच वेळ खर्ची पडला. मात्र, आजही शौचालयाचा प्रश्न पूर्णत: सुटलेला नाही. आजही गावाच्या बाहेरील रिंग रोडवर पहाटेच्या सुमारास नागरिक शौचाला बसलेले दिसून येतात. करडी ग्रामला स्मार्ट ग्राम करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाल्याचे मध्यंतरी सांगण्यात आले.
विकासाची ब्लू प्रिंट तयार असल्याचे बोलले गेले. मात्र, कागदावरील स्वप्न कुठे हवेत मुरले, कुणालाही समजेनासे झाले आहे. गरदेव चौकापासून करडी गावाला जोडणारा मुख्य पोर्च मार्ग अजूनही दुरवस्थेच्या अनेक कहाण्या सागत सुटला आहे. या मार्गावर खड्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न झाले. डांबर रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला. मात्र, मुरुम रस्त्यावर आता चिखलच चिखल पसरल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी मुरुम वाहून गेल्याने रस्त्याच मातीमोल ठरला आहे. गरदेव ते बाजार चौक, गांधी पुतळ्याच्या समोरपर्यंत डांबर रस्त्याला सिमेंट रस्त्यात रुपांतरीत करण्याशिवाय आता पर्याय नाही, असे नागरिकांचे मत आहेत.