मडेघाटच्या महिलांचा घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:08 PM2019-04-22T22:08:25+5:302019-04-22T22:08:49+5:30
तालुक्यातील मडेघाट येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यातच दहा दिवसांपासून नळ योजना बंद आहे. परिणामी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी लाखनी तहसीलवर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील मडेघाट येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यातच दहा दिवसांपासून नळ योजना बंद आहे. परिणामी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी लाखनी तहसीलवर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
यावर्षी पाऊस कमी पडल्याने तलाव पुर्ण क्षमतेने भरले नाही. आता उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मडेघाट येथेही पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नळ योजना गत आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे. संपूर्ण गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना तासन्तास पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
मडेघाट हे सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावासाठी चुलबंद नदीवर पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. जवळपास ७ ते ८ किमी अंतरावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणले जाते. गावात असलेल्या टाकीत पाणी साठवून गावात वितरित केले जाते पंरतू नदी कोरडी पडल्याने नळ योजना कुचकामी ठरत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच नळ योजनेला घरघर लागली होती. नियोजन शुन्यतेमुळे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढावा म्हणून मडेघाट येथील महिला सोमवारी लाखांदूरात धडकल्या. येथील तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यात जावून निवेदन देण्यात आले. ही नळयोजना पुर्ववत सुरु करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
पाण्यासाठी दाहीदिशा
मडेघाट सारखीच अवस्था लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांची झाली आहे. महिलांना पाण्यासाठी पहाटेपासूनच भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने अद्यापही पाणीटंचाईच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या नाहीत.