घोडेझरी ठरले जिल्ह्यातील पहिले ‘लसवंत’ गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:16+5:302021-08-28T04:39:16+5:30
घोडेझरीची लोकसंख्या १०५४ असून पात्र लाभार्थ्यांची संख्या ९४१ एवढी आहे. या सर्व व्यक्तींनी कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला ...
घोडेझरीची लोकसंख्या १०५४ असून पात्र लाभार्थ्यांची संख्या ९४१ एवढी आहे. या सर्व व्यक्तींनी कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ६७० असून २७१ लाभार्थी त्यांच्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या डोससाठी पात्र ठरणार आहेत. घोडेझरी ग्रामपंचायतीने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी केली. सरपंच, सदस्य व इतर पदाधिकारी तसेच ग्रामसेवक, तलाठी व इतर कर्मचारी यांनी याबाबत समूहाने काम केले. ग्रामपंचायतस्तरावर पदाधिकारी व कर्मचारी यांचे गट करण्यात आले. या सर्व गटांमध्ये लसीकरणासाठी शिल्लक असलेल्या ग्रामस्थांची यादी विभागून देण्यात आली. सर्व गटांना लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले. या सर्व गटांद्वारा ग्रामस्थांची वैयक्तिक भेटी घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
घोडेझरी येथे लसीकरणाचे चार कॅम्प घेण्यात आले. त्यासाठी सरपंच रेखाताई पडोळे, आशा वर्कर वृंदाताई दामले, पोलीस पाटील सुनील लुटे, ग्रामसेवक शैलेश लंजे, तलाठी रितेश देशमुख, ग्रामपंचायत सेवक काशिनाथ सेलोकर, मुख्याध्यापक ए. बी. शिवनकर, अंगणवाडी सेविका पुष्पा ठक्कर, कल्पना चौधरी, मदतनीस प्रीती काळे, ऑपरेटर राजू राघोर्ते, उमेद बचतगटातील महिला इत्यादी आणि गावकरी जनता यांचे सहकार्य लाभले. लसीकरणासाठी मुरमाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सुशील मरस्कोले, परिचारिका भाग्यश्री मदनकार व त्यांच्या चमूने सहकार्य केले.
बाॅक्स
घोडेझरीवर कौतुकाचा वर्षाव
घोडेझरी येथे शुक्रवारी नायब तहसीलदार छबीलाल मडावी, कोविड समन्वयक नरेश नवखरे यांनी भेट देऊन सर्वांचे कौतुक केले. प्रभारी तहसीलदार प्रतिभा दोनोडे, गटविकास अधिकारी लाखनी डॉ. शेखर जाधव, नायब तहसीलदार धर्मेंद्र उरकुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील हटनागर, गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके आणि जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.माधुरी माथूरकर यांनी कौतुक केले आहे.
बॉक्स
टोचाल तर वाचालचा संदेश
‘टोचाल तर वाचाल’ असा एक संदेश लसीकरणाबाबत सर्व समाजमाध्यमावर फिरत आहे. यात काही प्रमाणात सत्यताही आहेच. कोरोना या महामारीवर ‘लस’ हा एकमेव उपाय आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लस देण्याचे नियोजन केले आहे. अनेक गावात लसीकरणाचे विशेष शिबीर लावण्यात येत आहे.