पाय गमावलेल्या वृद्धाला दिली कृत्रिम पायाची भेट
By admin | Published: November 4, 2016 12:57 AM2016-11-04T00:57:18+5:302016-11-04T00:57:18+5:30
दिवाळीत फटाक्याच्या आतषबाजीवर तरुणांकडून हजारो रूपये उधळले जातात. परंतु हे पैसे फटाक्यांवर
लोकमत शुभवर्तमान : मदत करून साजरी केली तरुणाने दिवाळी
भंडारा : दिवाळीत फटाक्याच्या आतषबाजीवर तरुणांकडून हजारो रूपये उधळले जातात. परंतु हे पैसे फटाक्यांवर उधळण्यापेक्षा गरजूंना मदत करण्यासाठी दानशुरांचे हात समोर आले पाहिजे. परंतु दुदैवाने तसे होत नाही. परंतु भंडारा शहरातील गजू कुरंजेकर या तरूणाने अपघातात पाय गमावलेल्या एका वृद्धाला कृत्रिम पायाची (जयपूर फूट) भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजात आशेचा किरण दाखविणाऱ्या गजूसारख्या तरूणांची समाजाला गरज आहे. (प्रतिनिधी)
अपघातात आले होते अपंगत्व
राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात शिवदास वाहने हे ७० वर्षीय वृद्ध गंभीररित्या जखमी झाले होते. यात त्यांना एक पाय गमवावा लागला होता. एक पाय नसल्यामुळे वाहने यांना होणाऱ्या यातनांमुळे गजू अस्वस्थ होता. त्यामुळे दिवाळीच्या पर्वावर वाहने यांना कृत्रिम पायाची भेट देण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी वाहने यांच्यासाठी कृत्रिम पाय आणून दिला.
जखमींच्या मदतीसाठी तत्पर
गरजूंना मदत करण्यात समाधान मानणाऱ्या कुरंजेकरांनी अनेकांना स्वच्छेने मदत केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर त्यांचे हॉटेल आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघाताची माहिती होताच हातातली कामे बाजूला ठेऊन ते जखमीला रूग्णालयात नेतात. जखमींच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन ते येईपर्यंत रूग्णालयात सोबत राहतात.