तरूणीची भेट तरूणाच्या अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 12:18 AM2017-03-15T00:18:12+5:302017-03-15T00:18:12+5:30
सावधान... तरुणीला भेटण्यासाठी फोन करताय, तुम्ही अलगत सापळ्यात अडकू शकता.
भावाच्या मित्राने धू-धू धुतले : पोलीस कोठडीत होळीचा झाला बेरंग
मोहाडी : सावधान... तरुणीला भेटण्यासाठी फोन करताय, तुम्ही अलगत सापळ्यात अडकू शकता. एवढंच कशाच धुतलेही जाणार. असाच प्रकार रंगपंचमीच्या दिवशी मोहाडीत घडला. तरुणीला वारंवार फोन करणे तरूणाच्या अंगलट आले.
काल धुळीवंदनाचा दिवस होता. होळीचा रंगपंचमीचा दिवस तरूणाला बेफान करून जाते. या बेफान तरुणाने मोहाडीच्या एका तरुणीला भ्रमणध्वनी केला. गुलाल गाली लावून प्रेमाची पावती मिळेल ही भोळी आशा त्या तरुणाच्या अंगलट आली.
सिरसोली (कान्हळगाव) येथील तरुण लक्ष्मण उर्फ लच्छू जयचंद दमाहे (२५) हा मोहाडीतील एका तरुणीला वारंवार फोन करायचा.
तिला भेटण्यासाठी आग्रह करायचा. भेट कधी घडणार यासाठी तो कासावीस होता. भेटण्याचा मुहूर्त छान आहे समजून त्याने रंगपंचमीच्या दिवशी तिला भ्रमणध्वनी केला. तरुणीनेही भेटण्याचा होकार दिला. पहिल्या भेटीत रंगून जाऊन चांदपूरचे दर्शनही करू असे ठरविले. तरुण एकदम खूश झाला. कधी तिला भेटतोय याचा क्षण शोधत होता.
मोहाडीच्या तहसील जवळील बसस्थानकमध्ये भेटण्याचे ठरले. ती ठरलेल्या ठिकाणी आली. पण त्याला काय माहिती, माझ्यासाठी जाळे विणले गेले आहे. ती तरुणी अन् तरूणीच्या वडिलासह मित्र तिथेच होते. तो आला अन् तरुणीला भेटला. पुढे काय? आधी त्याला धू-धू धुतले. पोलिसांना खबर केली.
पोलीसही आले. त्याला उचलले. गुन्हा दाखल केला. रात्रभर पोलीस कोठडीत राहिला. विशेष म्हणजे ही तरुणी त्याला कधीच भेटली नाही. अन् तोही भेटला नव्हता. तो तरुण भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तरुणीशी सूत जुळविण्याचा प्रयत्न करीत होता.
तथापि तो असफल ठरला. तरुणीवर रंग उधळण्याचा निश्चयाने आलेल्या त्या मजनूला चोप तर खावाच लागला. शिवाय पोलीस कोठडीची हवा रात्रभर खावी लागली. (तालुका प्रतिनिधी)