मुलींनो झाशीची राणी बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:36 PM2017-09-17T22:36:58+5:302017-09-17T22:37:57+5:30
प्रचंड प्रयत्न करा, तरीही अपयश आले तरी अपयश पचवता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यासातून ज्ञान मिळवा. त्याने तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : प्रचंड प्रयत्न करा, तरीही अपयश आले तरी अपयश पचवता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यासातून ज्ञान मिळवा. त्याने तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. मुलींनो अर्धा तास व्यायाम करावा, देशी गाईचे दूध रोज प्यावे, धैर्य, हिंमत, संयम स्वत:मध्ये निर्माण करा, कामाशी प्रामाणिक राहा. जिद्दीने ध्येय गाठा, अन्याय सहन करू नका. मुलींनी स्वत:ला दलित गुलाम समजू नका, आत्मनिर्भर बना, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
साकोली येथील विद्यार्थिनींसाठी सुरु असलेल्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध व स्वसंरक्षणासाठी धडे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मनोहरभाई पटेल महाविद्यालयात केले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.छाया कापगते, भंडारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले, महिला आयोगाच्या जिल्हा समुपदेशिका मृणाल मुनीश्वर, जिल्हा समन्वयक वैशाली केळकर उपस्थित होत्या.
यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कापगते यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुुलींच्या शरीरातील बदल तसेच आहार, सुरक्षेसाठी तंत्र याविषयी माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर म्हणाल्या, साकोली तालुक्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणे किंवा किशोरवयीन मुली पळून जाणे असे प्रकार वाढले आहे. मुलींना स्वत:चे महत्त्व समजून घ्या, स्त्री ही वापरून घ्यायची वस्तू नाही. मुलींनी स्वत:च्या करिअरवर स्वयंकेंद्रीत व्हावे. उज्ज्वल यश मिळवावे.
उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले यांनी यशाचा मार्ग सांगितला. चारित्र्य जपा. आईवडीलांचे नाव कलंकीत होईल असे कुठलेही काम करू नका असे प्रतिपादन केले. उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे यांनी, मुलींनी स्वत:मधील गुण ओळखा. प्रयत्नातून ध्येय गाठा, असे प्रतिपादन केले. संचालन मनिषा काशिवार यांनी केले. तर आभार वैशाली केळकर यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.