बहुरुप्यांच्या पालावर मुलीचा वाढदिवस
By Admin | Published: June 7, 2017 12:31 AM2017-06-07T00:31:47+5:302017-06-07T00:31:47+5:30
गावोगावी भटकंती करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारा बहुरूपी समाजबांधव आजही आधुनिक जगापासून कोसोदूर आहे.
आनंदोत्सव : लाखनीच्या ब्रोकन मेन सोशल मुव्हमेंटचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गावोगावी भटकंती करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणारा बहुरूपी समाजबांधव आजही आधुनिक जगापासून कोसोदूर आहे. यांच्या वाड्या, झोपड्यांमध्ये प्रगतीचा प्रकाश पडलेला नाही. प्रगतीपासून दूर असलेल्या या समाजातील मतीमंद नयना राजू तांदुळकर या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा प्रकार बहुरूपी समाजासाठी अभिनव ठरला असला तरी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता त्यांनी जगासमोर आदर्श निर्माण केला आहे.
लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ब्रोकन मेन सोशियल मुव्हमेंटचे संयोजक सी. एम. बागडे, डॉ. सुरेश खोब्रागडे, डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी पालावर जाऊन मुलीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त मुलीला नवीन कपडे घेऊन दिले. तिच्या वाढदिवसानिमित्त केक कापून तथा अल्पोपहाराची व्यवस्था करून पालावर आनंदोत्सव साजरा केला. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले. यावर्षी पालावरची मुले विनोद बांते यांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेत जाणार आहेत. देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्षे झालीत. तरीही अजूनही भटके विमुक्त, बहिरुपी आणि इतर उपेक्षित जाती - जनजातीचे लोक मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. विविध सोंगे घेऊन लोकांच्या दारात जाऊन भीक मागणारी बहिरुपी जमात आजही भटक्याचे जीवन जगत असून गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे वास्तव्याला आहेत.
अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवन जगण्याच्या मुलभूत सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागते. पालांवर राहून आणि विविध आरोपांच्या छत्रछायेखाली माणुसकी गहाण ठेवून त्यांना अत्यंत अमानुषरितीने जीवन जगावे लागते. ३३ लोकंचे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून भटकंती करीत तीन वर्षापासून भिलेवाडा येथील सरपंच त्रिवेणी बांते आणि विनोद बांते यांच्या सहकार्याने वास्तव्य करून आहेत. त्या आधी १० वर्षे त्यांनी पिंपळगाव येथे घालविले होते. पालावर एका समाज मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून आणि अंकुश सादुराम तांदुळकर यांच्या आणि सरपंचाच्या पुढाकारातून सुरु असून सी.एम. बागडे यांनी त्या कामात सढळ हाताचे चार हजार रुपये देऊन सहकार्य केले. पावसाळा काही दिवसानंतरच सुरु आहे. परंतु समाजमंदिर पैसा अभावी छताविना पडून आहे.