मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:35 PM2019-02-16T21:35:06+5:302019-02-16T21:35:59+5:30
पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्व दिले जाते. मात्र ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप व्हायला हवी, असा दृष्टीकोन लक्षात घेऊन साकोली येथे परंपरेला फाटा देत मुलींनी वडीलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्व दिले जाते. मात्र ती बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप व्हायला हवी, असा दृष्टीकोन लक्षात घेऊन साकोली येथे परंपरेला फाटा देत मुलींनी वडीलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
माहितीनुसार, साकोली येथील रहिवासी असलेले रवींद्र तुकाराम गजापुरे (५२) यांचे १४ फेब्रुवारीला निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी तथा दोन मुली असा परिवार आहे. गजापुरे यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले. अपत्य म्हणून मुलीच आपल्याला असल्याने रवींद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. गजापुरे यांच्या दोन्ही मुली भावना व प्राची यांनी दु:खात स्वत:ला सावरून पित्याच्या पार्थिवाला खांदा देत मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सगळ्यांनी बळ देत गजापुरे यांची अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली.
घरातून अंत्ययात्रा निघाल्यापसून हंडी पकडणे, पार्थिवाला खांदा देणे या क्रियाही मुलींनीच पार पाडल्या. स्मशानघाटात नदीत डुबकी घालून खांद्यावर हंडीत पाणी भरून फेरी घालण्याचे संपूर्ण विधीही या दोन्ही बहिणींनीच पार पाडले. वडीलांच्या पार्थिवाला भडाग्नी देत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली. अंत्यसंस्कारविधीचा हा अनुभव दृश्य उपस्थितांनी प्रत्यक्ष पाहिला. याबाबत शहरात दिवसभर चर्चा होती.