जीर्णावस्थेतील इमारतीत मुलींचे वसतीगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 12:25 AM2016-07-07T00:25:34+5:302016-07-07T00:25:34+5:30
तुमसर तालुक्यातील आदिवासी मुलींना हायस्कुल ते पदव्युत्तर शिक्षण प्राप्त व्हावे याकरिता राज्याच्या आदिवासी विकास खात्याने तुमसर ...
तुमसरातील प्रकार : आदिवासी मुलींचे आयुष्य धोक्यात
मोहन भोयर तुमसर
तुमसर तालुक्यातील आदिवासी मुलींना हायस्कुल ते पदव्युत्तर शिक्षण प्राप्त व्हावे याकरिता राज्याच्या आदिवासी विकास खात्याने तुमसर शहरात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सन २०१०२ मध्ये सुरु केले. सध्या हे वसतिगृह जिर्ण अतिशय धोकादायक आयुष्य संपलेल्या इमारतीत बजाज नगरात सुरु आहे. ७५ मुली येथे जीव मुठीत घालून राहत आहेत. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी या वसतिगृहाला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली होती हे विशेष.
राज्य शासनाने सन २००२ मध्ये तुमसरात आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह सुरु केले. या वसतिगृहात ७५ मुली वर्ग ८ ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या राहतात. बजाज नगरात हे वसतिगृह सुरु आहे. ही इमारत शासनाने भाड्याने घेतली आहे. जीर्ण अतिशय धोकादायक आयुष्य संपलेल्या इमारतीत हे वसतिगृह सुरु आहे. वसतिगृहासमोर मोठमोठी झाडे आहेत. समोर पाणी साचले असून इमारतीच्या वरच्या माळ्यावर काही खोल्यात पाणी गळणे सुरु आहे. याकरिता प्लास्टीक लावण्यात आले आहे.
प्रत्येक खोल्यात कुंदट उग्रवास येतो. इमारतीच्या भिंतीचे सिमेंट प्लास्टर निघाले आहे. इमारत कोसळण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. मुलींच्या वसतिगृहाकरिता ही इमारत शासनाने कशी काय निवडली हा मुख्य प्रश्न आहे. सध्या या इमारतीचे भाडे २४ हजार प्रती महिना आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने भाडेआकारणी केली आहे. मुलांचे वसतिगृह भंडारा रोड येथे भाड्याने आहे. तिथे ११० मुले राहतात.
तुमसर येथे शासकीय आयटीआय समोर मुलामुलींचे नवीन वसतिगृहाचे बांधकाम मागील तीन वर्षापासून कासवगतीने सुरु आहे. सन २०१२-२०१३ मध्ये त्याला मंजुरी मिळून बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह इमारतीकरिता १ कोटी ७० लाख (एका इमारती) करिता मंजुर करण्यात आले. वेळेत वसतिगृह तयार न झाल्याने किंमत वाढली. शासनाने येथे मुलांच्या वसतिगृहाकरिता ४ कोटी २७ लक्ष व मुलींच्या वसतिगृहाकरिता ४ कोटी २७ लक्ष निधी मंजूर केला. सध्या कामे प्रगतिपथावर सुरु आहे. शासन व प्रशासनाने लक्ष वेधून घेण्याकरिता आठ दिवसांपूर्वी आदिवासी संघटनेने धरणे आंदोलन सुरु केले होते. संघटनेचे पदाधिकारी माजी जि.प. सदस्य अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दिनेश धुर्वे यांनी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांची मुंबईत भेट घेवून समस्या मांडली.