पदोन्नतीमध्ये लाभ द्या
By admin | Published: September 21, 2015 12:26 AM2015-09-21T00:26:52+5:302015-09-21T00:26:52+5:30
जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे कर्मचारी कार्यरत आहेत.
धनगर समाजाची मागणी : नाना पटोले यांना निवेदन
चिचाळ : जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र पदोन्नतीमध्ये दरवर्षी त्यांना डावलण्यात येते. वर्षाला होणाऱ्या पदोन्नतीमध्ये धनगर एन. टी. ‘क’ दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समाविष्ट करावा, या आशयाचे निवेदन खासदार नाना पटोले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांना धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजात शिक्षणाचा अभाव आहे. या समाजातील युवक चतुर्थश्रेणी पदावर विविध कार्यालयात पदावर कार्यरत आहेत. शासनाने धनगर समाजाला एन.टी. ‘क’ चे सर्वात जास्त प्रमाणात आरक्षण असुन सुध्दा दरवर्षी होणाऱ्या पदोन्नतीमध्ये एन.टी. ‘क’ ऐवजी एन.टी.‘ब’ आणि एन.टी. ‘ड’ ची नियुक्ती करुन एन.टी.‘क’ वर अन्याय करीत आहेत. यावर्षी होणाऱ्या पदोन्नतीमध्ये धनगर एन.टी. ‘क’ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश हातेल, पंडीतराव पांडे, प्रा. दिलीप ढगे, सुनिल सुर्यवंशी, सुकराम धनीस्कार, तुळशीराम खऊळ आदींचा समावेश होता. (वार्ताहर)