अंत्यसंस्कारासाठी मुलाचा मृतदेह द्या हो!
By admin | Published: April 9, 2016 12:21 AM2016-04-09T00:21:08+5:302016-04-09T00:21:08+5:30
मुलगा घरून बेपत्ता झाल्यापासून ‘त्या’ आईवडिलाची झोप उडाली होती. तब्बल १४ दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता.
निपेश खून प्रकरण : किन्ही मोखे येथील रामटेके कुटुंबीयांचा टाहो
भंडारा : मुलगा घरून बेपत्ता झाल्यापासून ‘त्या’ आईवडिलाची झोप उडाली होती. तब्बल १४ दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता. मृतदेह कुजलेला आहे, हे कारण सांगून शवविच्छेदनासाठी नागपूरला नेलेला मृतदेह आठ दिवसांपासून त्यांना मिळालेला नाही. आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवाल करून अंत्यसंस्कारासाठी मुलाचा मृतदेह द्या हो! यासाठी रामटेके दाम्पत्यांची दीनवाणी याचना सुरू आहे. परंतु मृतदेह मिळवून देण्यासाठी कुणीही समोर आलेला नाही.
साकोली तालुक्यातील किन्ही (मोखे) येथील रहिवाशी निपेश तुलाराम रामटेके हा २२ वर्षीय तरूण १९ मार्चपासून बेपत्ता झाला. त्याचे अपहरण करुन खून केल्याची तक्रार निपेशचे वडील तुलाराम रामटेके यांनी २० मार्च रोजी साकोली पोलीस ठाण्यात केली. तब्बल १४ दिवसानंतर निपेशचा मृतदेह चारगाव जंगल शिवारात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेह कुजलेला असल्यामुळे कपडे हातातील कडा व अंगठीवरुन निपेशची ओळख पटल्यानंतर शवविच्छेनासाठी साकोलीच्या डॉक्टरांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. मात्र मृतदेह कुजलेले असल्यामुळे त्यांनी शवविच्छेदनास नकार दिला. त्यामुळे नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. आधीच दु:खात असताना दुसऱ्या दिवशी तरी मृतदेह मिळेल आणि अंत्यसंस्कार करता येईल, अशी त्या आईवडिलाची ईच्छा होती. परंतु आठ दिवसांपासून मृतदेह न मिळाल्यामुळे रामटेके कुटूंबीय मुलाच्या आठवणीत दररोज दिवस कंठत आहेत. गुरूवारला माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासोबत पोलीस अधीक्षकांकडे आलेल्या तुलाराम रामटेके यांच्याशी भेट झाली असता डबडबत्या डोळ्यांनी मुलाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे सांगत माझ्या मुलाचा जीव गेला आहे आता क्रियाकर्मासाठी मुलगा मिळवून द्या, असे धाय मोकलून रडताना उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
मृतदेह द्या - समरीत
निपेश बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसापर्यंत हे प्रकरण थंडबस्त्यात होते. साकोली काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर समरीत यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली. यासंदर्भात समरीत म्हणाले, या निपेश खून प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच साकोली पोलिसांनी दिरंगाई केली असून पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. निपेश ज्यादिवशी बेपत्ता झाला त्यादिवसापासून आम्ही निपेशचा शोध घेण्याची मागणी केली असता तपास सुरूच असल्याचे पोलीस सांगत राहिले, आता खून कोणत्या कारणासाठी हे मात्र सांगत नाहीत. (जिल्हा प्रतिनिधी)
खुनाचे कारण गुलदस्त्यात !
१९ मार्च रोजी निपेश हा घरी टीव्ही पाहत होता. दरम्यान, शैलेश गणवीर या तरुणाने भ्रमणध्वनी करुन निपेशला घरी बोलावले. त्यानंतर तो घरी परतलाच नाही, अशी तक्रार निपेशचे वडील तुलाराम रामटेके यांनी साकोली पोलीस ठाण्यात केली. मुलाचे अपहरण करुन त्याचा खून केल्याचा संशयही त्यांनी तक्रारीत केला होता. दरम्या १ एप्रिल रोजी सकाळी चारगाव जंगल शिवारात मृतदेह आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शैलेश गणवीर, त्याची पत्नी अस्मिता गणवीर या दोघांना अटक केली तर राधेशाम गणवीर, जगदीश गणवीर, वामन गणवीर, दिलीप उंदीरवाडे या चौघांची चौकशी करीत आहेत. परंतु खून का? करण्यात आला याची माहिती मिळविण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अपयश आले आहे.
हा तर अन्यायच -वाघाये
रामटेके कुटुंबीयांवर दु:खाचा पहाड कोसळलेला असताना त्यांना मुलाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. आणखी किती दिवस मृतदेहाची प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न करून या प्रकरणात साकोलीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश धुसर यांनी तपासात दिरंगाई केली असा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला.