स्वच्छतेच्या कार्याला लोकचळवळीचे स्वरुप द्या
By Admin | Published: January 31, 2015 11:15 PM2015-01-31T23:15:31+5:302015-01-31T23:15:31+5:30
प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वर्क्तृत्व गुण असतात. स्वत:मधल वर्क्तृत्व गुणांच्या सहाय्याने सामाजाची सेवा करता येते. पाणी व स्वच्छतेच्या विषयाला गावोगावी पोहचविण्यासाठी
भंडारा : प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वर्क्तृत्व गुण असतात. स्वत:मधल वर्क्तृत्व गुणांच्या सहाय्याने सामाजाची सेवा करता येते. पाणी व स्वच्छतेच्या विषयाला गावोगावी पोहचविण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी वर्क्तृत्व गुणांचा उपयोग करावा, जेणे करून पाणी व स्वच्छतेच्या विषयाला लोकचळवळीचे स्वरुप देता येईल, असे प्रतिपादन शासकीय अध्यापक महाविद्यालय, भंडाराच्या प्राचार्या वीणा लांडे यांनी केले. त्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी मंचावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.), मंजुषा ठवकर, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉ.उपाध्ये, सांस्कृतिक विभागाचे डॉ.अ.हे. वरघट, शासकीय अध्यापक विभागाचे डॉ.वातकर, डॉ.इंगोले, प्रा.मुंडासे, विक्रम फडके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डी.एम. बिसेन आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ.लांडे म्हणाल्या, प्रत्येक स्पर्धेत बक्षिस असते. परंतु नुसरे बक्षिसासाठी काम करायचे नाही. आपल्या विचाराला मर्यादित न ठेवता पाणी व स्वच्छतेची चळवळ उभी करण्यासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा. आपले कर्तव्य म्हणून समाजाची सेवा करण्यासाठी स्वच्छतामित्र म्हणून वर्क्तृत्व गुणांचा फायदा झाला तर स्वच्छतेची चळवळ उभी राहील व स्वच्छ भारत मिशन सारखे कार्यक्रम यशस्विरित्या राबविता येईल असे मत व्यक्त केले. यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) ठवकर यांनी, दरवर्षी होणाऱ्या या स्वच्छतामित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धेतून पाणी व स्वच्छतेचे कार्य करणारे स्वच्छतामित्र निवडायचे असतात. बक्षिसापेक्षाही स्वच्छतामित्राच्या हातातून ग्रामस्तरावर होणारे पाणी व स्वच्छतेबाबतचे कार्य लाख मोलाचे आहे. स्पर्धेतून पाणी व स्वच्छतेबाबतचे मत व्यक्त करून गेल्यानंतर गावात त्या विचारांचा प्रसार करावा व चांगला समाज, आदर्श गाव घडविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे मत मांडले.
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम कनिष्ठ गटातून स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी स्पर्धकांनी पाणी व स्वच्छता संबंधित वेगवेगळ्या विषयाला धरून मत मांडले.
एकापेक्षा एक सुरेख विचार मांडून ग्रामस्तरावर लोकहभागातून कार्य करण्याची गरज असल्याचा सूर यावेळी दिसून आला. तर वरिष्ठ गटातूनही एकापेक्षा एक सरस विचार मांडीत प्रत्येकानी स्वत:चा थोडासा वेळ गावाच्या विकासासाठी दिल्यास आपल्या स्वप्नातील भारत देश, आदर्श निर्मल गाव, पाण्याची सुरक्षितता ठेवण्यात स्वच्छतामित्र म्हणून पुढे येण्याचा सूर उमटला.
वरिष्ठ गटातील १३ तर कनिष्ठ गटातून १४ असे एकूण २७ स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर काही वेळातच निकाल घोषित करण्यात आले.
कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक नगरपालिका ज्युनिअर महाविद्यालय पवनीच्या विद्यार्थी जयंत भैय्याजी देशमुख, द्वितीय क्रमांक जी.के. अग्रवाल महाविद्यालय तुमसरची विद्यार्थिनी सायली गजानन शुक्ला, तर तृतीय क्रमांक नगरपरिषद गांधी ज्युनिअर महाविद्यालय भंडाराचा विद्यार्थी आकाश कैलाश गोंडाणे तसेच वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक इंदूताई अध्यापक विद्यालय तुमसरचा विद्यार्थी कामेश्वर ब्रिजलाल पटले, द्वितीय अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढाचा विद्यार्थी जितेंद्र बाबूराव मेश्राम तर तृतीय क्रमांक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय लाखांदूरची विद्यार्थीनी विद्या श्रीराम झोडे यांनी पटकाविला. दोनही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार, ५ हजार रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे तर प्रास्ताविक व आभार राजेश्वर येरणे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ निलीमा जवादे, स्वच्छता तज्ज्ञ गजानन भेदे, क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे, नेत्रदिपक बोडखे, बबन येरणे, देवेंद्र खांडेकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)